गत दहा दिवसांत २६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:30 AM2021-05-05T04:30:05+5:302021-05-05T04:30:05+5:30
अनंत वानखडे बाळापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुका हॉटस्पॉट बनत चालला ...
अनंत वानखडे
बाळापूर : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. तालुका हॉटस्पॉट बनत चालला असून, गत दहा दिवसांत २६० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गत दहा दिवसांत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र असून, ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कारवाई थंडावल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात २६० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तालुक्यात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. प्रशासनामार्फत कोविड प्रतिबंधक उपाययोजना करताना दिसत नसल्याने कोरोनाचा दैनंदिन आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी एकदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास परिसर सील करणे व इतर उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र, सद्य:स्थितीत तसे केले जात नाही. होम क्वारंटाइन असलेले रुग्ण दिवसभर शहरात वावरताना दिसून येत आहेत, तसेच शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, नागरिक विनामास्क मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. (फोटो)
----------------------------------------------
बाजारपेठेसह दुकानात नियमांचे उल्लंघन!
शहरातील बाजारपेठेत नागरिक विनामास्क वावरत आहेत, तसेच दुकानांमध्ये दुकानदारांसह ग्राहक विनामास्क दिसून येत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काेरोनाला रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे, तसेच सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू आहे. यावेळेत नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.