वीज मीटरचे उशिरा रिडिंग, ग्राहकांना भुर्दंंड !
By admin | Published: September 24, 2016 03:01 AM2016-09-24T03:01:12+5:302016-09-24T03:01:12+5:30
३0 दिवसांनंतर रिडिंग घेण्याचे बंधन; मात्र कंत्राटदाराकडून होते हलगर्जी.
अकोला, दि. २३- विजेचे वाढते बिल हे ग्राहकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. विजेचा वापर व येणारे बिल यावरून अनेकदा महावितरणचे अधिकारी व ग्राहकांमध्ये खटके उडत असतात. या वाढीव वीज बिलामागे विजेच्या दरात होणारे चढ-उतार कारणीभूत आहेतच; परंतु उशिरा मीटर रिडिंग घेण्याचाही फटका ग्राहकांना बसत असल्याचे समोर आले आहे.
विजेच्या वापरानुसार विजेचा दर आकारला जातो. पहिल्या शंभर युनिटसाठी ३ रुपये ७६ पैसे प्रतियुनिट दर आहे, तर शंभर युनिटच्या वर रिडिंग गेल्यास हेच दर दुप्पट म्हणजेच ७ रुपये २१ पैसे प्रतियुनिट आहे. विजेचा वापर हा ३00 युनिटपेक्षाही जास्त झाल्यास दर तिप्पट म्हणजे ९ रुपये ९५ पैसे प्रतियुनिट आहे. ५00 च्या वर हाच दर ११ रुपये ३१ पैसे होतो. या दरानुसार प्रत्येक ग्राहकाचे वीज मीटर रिडिंग हे तीस दिवसांचे घेणे अपेक्षित आहे.
प्रत्यक्षात मात्र तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर वीज मीटरचे रिडिंग घेतले जात असल्याने ग्राहकांना विजेच्या दरातील बदलाचा फटका बसतो. समजा तीस दिवसांत मीटर रिडिंग घेतले व हे रिडिंग १00 युनिटपर्यंत असेल, तर त्याला लागणारा दर हा सर्वात कमी आहे; मात्र तीस दिवसांनंतर हेच रिडिंग घेण्यात आले, तर ते निश्चितच शंभर युनिटपेक्षा जास्त होते व त्यामुळे वीज दराचा दुसर्या क्रमांकाचा म्हणजेच प्रतियुनिट ७ रुपये २१ पैसे हा दर लागतो.
वीज मीटर रिडिंग घेण्यासाठी महावितरणने कंत्राट दिले असून, या कत्रांटदाराने तीस दिवसांच्या आत रिडिंग घेणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. अनेकदा तर वीज बिलावर मीटरचा फोटोही नसतो तसेच तीस दिवस उलटल्यानंतर मीटर रिडिंग घेतले जाते. या सर्व प्रकाराकडे महावितरणने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. या संदर्भात महावितरणचे कुठलेही अधिकारी अधिकृत बोलायला तयार नाहीत. मात्र तीस दिवसांनंतर मीटर रिडिंग जरी नोंदविण्यात आले असले, तरी वीज बिल तयार करताना तीस दिवसांचाच कालवधीच नोंदविला जातो. तशी रचनाच संगणकाद्वारे आहे अशी माहिती मिळाली असली तरी प्रत्यक्षात मात्र वाढलेल्या ३0 दिवसानंतरचे विज देयक १00 युनिटपेक्षा जास्त झाले तर वाढीव दराचा भुर्दंंड ग्राहकांना बसत आहे. याकडे महावितरणचे दूर्लक्ष होत आहे.