'सर्वोपचार'मध्ये मिळणार राज्यातील रुग्णालयातील खाटांची अद्ययावत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 02:03 PM2019-03-06T14:03:26+5:302019-03-06T14:03:33+5:30
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात स्क्रीन लावण्यात आली असून, यावर राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या तसेच इतर आवश्यक माहिती दर्शविण्यात येणार आहे.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागात स्क्रीन लावण्यात आली असून, यावर राज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या तसेच इतर आवश्यक माहिती दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे दुर्धर आजारांनी पीडित दुर्बल घटकातील रुग्णांना होणारा त्रास टाळणे शक्य होणार असून, याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या स्क्रीनचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना माहिती देताना ते बोलत होते. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. अशोक ओळंबे, धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने, सहायक धर्मादाय आयुक्त शुभांगी नामघाडगे, रुग्ण निरीक्षक ज्योती दांदळे, उज्ज्वला गव्हाळे आदींसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरात धर्मादाय न्यासाकडे नोंदणी केलेल्या नामांकित रुग्णालयात निर्धन घटकातील रुग्णांसाठी दहा टक्के, तर दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातात. या सुविधेचा दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना लाभ मिळण्यासाठी या रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत, याची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. निर्धन रुग्णांसाठी अशा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात, तर दुर्बल घटकांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. ही सुविधा प्रथमच आपल्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दुर्बल घटकांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित
राज्यातील मोठ्या शहरांतील धर्मादाय न्यासाकडे नोंदणी केलेल्या नामांकित रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवल्या जातात. सुविधाचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी धर्मादाय उपायुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन धर्मादाय उपायुक्त किशोर मसने यांनी केले.