शेतक-यांपर्र्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचावे
By admin | Published: December 5, 2014 01:29 AM2014-12-05T01:29:41+5:302014-12-05T01:29:41+5:30
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादात तज्ज्ञांचे मत
अकोला: सततच्या नापिकीमुळे शेतकरी खचला असतानाच विदर्भातील महिला शेतकर्यांमधील अंगभूत निर्णयक्षमतेमध्ये विदर्भातील शेतीला तारून नेण्याची क्षमता आहे; मात्र त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होणे गरजेचे आहे. आज शेती तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असताना शेतकर्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचू शकले नाही. त्यामुळे समाजाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांपर्यंत नवीन विज्ञानाचा दुवा पोहोचला पाहिजे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी संवाद -२0१४ अंतर्गत ह्यअप्रचलित शेती आणि तंत्रज्ञानह्ण या विषयावरील परिसंवादात उमटला.
जगातील बहुतांश भागातील शेती आज प्रगत होत असून, अन्नधान्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानादेखील प्रत्येक तोंडापर्यंत पुरेसे अन्न पोहोचले नसल्याचे वास्तव इंग्लंड येथील कृषितज्ज्ञ जीम विगन यांनी परिसंवादात मांडले. त्यांनी उत्पादनवाढीबरोबरच बाजारात सुरू असलेल्या नफेखोरीवर अंकु श आणण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी नैतिक मूल्यांचा ऊहापोह करून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करण्यावर भर दिला. सुसंवाद, सेवा आणि एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला.
अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डेव्हिड विनडॉर्फ यांनी माती परीक्षणाच्या आधुनिक पद्धतीवर प्रकाश टाकला. अद्ययावत पद्धतीनुसार मातीचे प्रत्यक्ष नमुने न घेता केवळ लेझर किरणांद्वारे माती परीक्षणातून मातीची गुणवत्ता, त्यातील जीप्सम, सल्फर व अन्य घटकांचे प्रमाण लक्षात येत असल्याचे नमूद केले. या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग घेण्यासाठी टेक्सास विद्यापीठाशी करार करण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. इस्त्रायल येथील संत्राउत्पादक तज्ज्ञ डोह रॅबेर यांनी संत्र्याची जास्त घनता लागवड पद्धतीवर प्रकाश टाकून शेतकर्यांच्या शंकांचे निरसन के ले. सर रतन टाटा ट्रस्टचे अमितांशु चौधरी यांनी ट्रस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या कृषी उपक्रमांवर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक पी. जी. इंगोले यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून महिला सबळीकरण प्रकल्पावर प्रक ाश टाकला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आशिया पॅल्ट्यू या संस्थेचे संचालक डॉ. रवींद्र राव होते. मंचावर प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख, डॉ. एस. के. अहेरकर आणि अमेरिकेतील कृषितज्ज्ञ सारा ह्यूमन उपस्थित होते.
*शेतकर्यांना तंत्रज्ञानाचा लाभ होतो का?
तंत्रज्ञान शेतीपूरक असले तरी ते व्यापारी तत्त्वाला धरून असते. पण त्याच्या वापरातून शेतकर्याला लाभ मिळणार असेल, तरच तंत्रज्ञानाचा प्रसार होऊ शकतो अन्यथा नाही, अशी कोपरखळी प्रगतिशील शेतकरी ललित बहाळे यांनी परिसंवादादरम्यान मारली. तज्ज्ञांशी प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
*शेती केवळ पोट भरण्याचा धंदा झाला
शेती पैसा कमाविण्याचा धंदा नाही, तो केवळ पोट भरण्याचा धंदा म्हणून शिल्लक राहिला असल्याची खंत यवतमाळ येथील सेंद्रिय शेती कसणारे शेतकरी कमलकिशोर धोरण यांनी व्यक्त केली. विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेती चळवळ अधिक व्यापक करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.