ग्रामीण शिक्षणाला बळकटी देण्यासाठी घरातून शिक्षणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 09:36 AM2021-06-30T09:36:13+5:302021-06-30T09:36:20+5:30
Education Sector News : ग्रामीण शिक्षणाला बळकटी देणारी प्रणाली अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
अकोला : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक वाताहात होत आहे. ऑनलाइन शिक्षणालाही मर्यादा असून ग्रामीण भागातील शिक्षणात साधनांचा अपुरेपणा अडथळा बनत आहे. याकरिता बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथील शाळेने उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास किटचे वाटप करण्यात आले असून ग्रामीण शिक्षणाला बळकटी देणारी प्रणाली अमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
मागील दीड वर्षापासून ग्रामीण भागात शिक्षणाची प्रचंड वाताहत होत आहे. कोरोनाचा उद्रेक अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे सारकिन्ही येथील शाळेचे मुख्याध्यापक ब्रह्मसिंग राठोड यांनी शैक्षणिक सत्र २०२१-२२ ची सुरुवात घरातूनच करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या सहकारी शिक्षकाने त्यांना साथ दिली. मंगळवारी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणाला पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि घर यांना एकत्रितपणे जोडले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शिक्षण प्रभावित होणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास किट देण्यात आल्या. यामुळे घराबाहेर न पडता, घरातच मुलांचा अभ्यास सातत्याने चालूच राहणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसणार आहे. येथे प्रत्येक घरात मुले अभ्यास किट सोबत खेळताना दिसत आहे. याप्रसंगी शिक्षकांनी १६० घरात साहित्य वितरित केले. यावेळी केंद्रप्रमुख जानोरकर, स.अ. सराफ, मानकर, पुपलवार, टाकसाळे, नालिंदे, नाईक, लहाने, बनसोड, ठाकरे, सोपान काळे उपस्थित होते.
शहर व ग्रामीण शिक्षणातील दरी भरून काढणारा उपक्रम
साधनांचा वापर करून ऑनलाइनद्वारे पुढे जाणारे शहरी शिक्षण व साधनांच्या अपुरेपणामुळे मागे पडलेले ग्रामीण भागातील शिक्षण यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी हा महत्त्वाकांशी उपक्रम असल्याचे समितीचे अध्यक्ष रामेश्वर आंबेकर यांनी सांगितले.
साधनाच्या अपुरेपणावर मात करून घरातूनच शिक्षणाला शुभारंभ करणारी ही शाळा भविष्यात आपला ठसा उमटवेल. उत्साही मुले आणि ग्रामीण शिक्षणाला बळकटी देणाऱ्या घराघरातल्या १६० शाळा स्तुत्य उपक्रम आहे.
- डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
ऑनलाइनच्या समस्येवर उपाययोजना व कोरोनाला आळा घालण्यासाठी घरातूनच शिक्षणाला शुभारंभ करीत आहोत.
- ब्रह्मसिंग राठोड, मुख्याध्यापक, सारकिन्ही