‘जलमित्र अभियाना’चा थाटात शुभारंभ
By admin | Published: May 11, 2016 02:35 AM2016-05-11T02:35:19+5:302016-05-11T02:35:19+5:30
अकोला येथील हॉटेलचालकांचा सक्रिय सहभाग; पाणी बचतीचा निर्धार नोंदविला.
अकोला: सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे आवश्यक असल्याने 'लोकमत'चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाचा मंगळवार, १0 मे रोजी अकोल्यात थाटात शुभारंभ झाला. सहा आठवड्यांच्या या मोहिमेत शहरातील हॉटेलचालक सक्रिय सहभागी झाले असून, प्रत्येक हॉटेलमध्ये पाणीबचत करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी लोकमत शहर कार्यालयात पार पडलेल्या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी केला.
महाराष्ट्रातील बहुतांश भागासह देशात विविध ठिकाणी सध्या जलसंकट ओढवले आहे. या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर ह्यलोकमतह्णने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या जलमित्र अभियानाचा शुभारंभ मंगळवार, १0 मे रोजी गीता नगरातील ह्यलोकमतह्ण शहर कार्यालयात झाला. यावेळी खाद्यपेय विक्रेता संघाचे अध्यक्ष तथा हॉटेल मिर्च मसालाचे संचालक योगेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने शहरातील नामवंत हॉटेल व्यवसायिक आवर्जून सहभागी झाले होते. लोकमतच्या वतीने अकोला आवृत्तीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, उप वृत्त संपादक राजू ओढे हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांना सहा आठवड्यांच्या या अभियानाची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. या अभियानाचे पोस्टर व इतर साहित्य आपापल्या हॉटेल्समध्ये लावून पाणी बचतीचा संदेश देण्याची तयारी सर्वांनीच दर्शविली, तसेच पाणी बचतीसाठी काही पर्यायही सुचविले. मान्यवरांचे यावेळी लोकमतच्या वतीने स्वागत करण्यात आले. या स्तुत्य अभियानात सर्वांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि मेसमध्ये 'ग्लास ऑफ वॉटर ऑन ग्राऊंड' ही मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.