निंब बीज व सीड बॉल रोपण अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:52 AM2020-07-11T10:52:25+5:302020-07-11T10:52:42+5:30
निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला.
अकोला : भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत जिल्ह्यात निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला. अकोला जिल्हा व शहराला पर्यावरणदृष्ट्या अत्यंत लाभदायक असलेल्या या अभियानात प्रत्येक अकोलेकरांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच भारत वृक्ष क्रांती मिशनचे ए. एस. नाथन यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला ते अकोट या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हे बीजारोपण करण्यात येणार असून, वटवृक्षाच्या बियांचे सीड बॉलही दुतर्फा टाकून त्यांचे रोपण करण्यात येणार आहे. ए.एस. नाथन यांनी अकोला येथून अकोटकडे हे बीजारोपण करीत व सीड बॉल टाकत पदयात्रा सुरू केली. भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’, ‘एक जन्म, एक वृक्ष’ ही वृक्षारोपणाची मोहीम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाच्या बीजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे. निंबाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या लागवड अभियानाचा साऱ्यांना फायदाच होईल, असे ए.एस. नाथन यांनी सांगितले.
असे राबविण्यात येणार अभियान
या उपक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करून आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फूट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजूबाजूला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजूबाजूला व इतर पडीक जमिनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांच्यामार्फत बियांचे रोपण करण्यात येईल.