सेवानिवृत्त लिपिकाकडून पोलिसांना कायद्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 02:32 PM2019-07-07T14:32:52+5:302019-07-07T14:33:19+5:30
अकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या एका वरिष्ठ लिपिकाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कार्यप्रणालीतील बारकावे आणि संविधानातील महत्त्वपूर्ण विषयावर कायदेशीर धडे गिरवित आहेत.
- संजय खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सेवानिवृत्त झालेल्या एका वरिष्ठ लिपिकाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कार्यप्रणालीतील बारकावे आणि संविधानातील महत्त्वपूर्ण विषयावर कायदेशीर धडे गिरवित आहेत. राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणाºया महादेवराव नवरखेडे या तज्ज्ञ अभ्यासकाची महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमीकडून दखल घेत त्यांचा गौरव केला आहे.
अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा देत असतानाच नवरखेडे यांचे नाव लौकिक झाले होते. आयपीएस असो की आयएएस अधिकारी, त्यांच्यासमोर न घाबरता आपल्या सहकाऱ्यांवरील अन्यायाच्या चौकशीत (डीईत) ते बाजू मांडायचे. त्यामुळे नवरखेडे यांच्यातील तज्ज्ञ अभ्यासक अल्पावधीत राज्यभरात सुपरिचित झाला. त्यानंतर आयएएस आणि आयपीएस अधिकाºयांनीच नवरखेडे यांच्या व्याख्यानाचे वर्ग कर्मचारी आणि अधिकाºयांना देणे सुरू केले. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेत नवरखेडे आता राज्यातील अधिकाºयांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहे.
राज्यातील पोलीस उपअधीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या ४६ पोलीस निरीक्षकांना नवरखेडे २४ ते ६ जुलैपर्यंतच्या कार्यकाळात मार्गदर्शन करून आले आहे. महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी, नाशिकच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्या या पोलीस अधिकाºयांना सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक नवरखेडे यांनी कायद्याचे धडे दिलेत. दोन आठवड्यांच्या सेवाअंतर्गत प्रशिक्षण सत्रात त्यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद क्रमांक ३११ (२)अ,ब,क तसेच पोलीस अधिकारी यांच्या कक्षा, कारवाई आणि नियम यातील बारकाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणानंतर नवरखेडे यांना ताम्रपत्र आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.