महाबीजसह तीन कंपन्यांविरुद्ध खटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:28 AM2020-08-07T10:28:42+5:302020-08-07T10:28:56+5:30
महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पेरलेले सोयाबीनचे बियाणे न उगवल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गुरुवारी महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत बार्शीटाकळी न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा चांगला पेरा केला होता; परंतु पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले. बियाणे उगवले नसल्याने जिल्हाभरातून कंपन्यांविरुद्ध तक्रारी येऊ लागल्या. तक्रारीसोबतच शेतकºयांनी नुकसानभरपाई म्हणून एकरी उत्पादन खर्चाची मागणी केली होती; मात्र महाबीजसह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांकडून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत महाबीजसह इतर खासगी कंपन्यांची बियाणे उगवण क्षमतेत अप्रमाणित निघाल्याचे समोर आले. तसा ठपका बियाणे गुणवत्ता प्रयोगशाळांनी ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून संबंधित कंपन्यांना कृषी विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यापैकी तीन कंपन्यांनी दिलेला खुलासा पटण्याजोगा नसल्याने कृषी विभागाने तीनही कंपन्यांच्या विरोधात बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल केला आहे.
आतापर्यंत पाच कंपन्यांविरोधात खटला
अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरणी यापूर्वी मूर्तिजापूर तालुक्यात दोन कंपन्यांविरोधात बियाणे उगवणक्षमता कमी असल्याने खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मे. सारस अॅग्रो इंडस्ट्रीज व मे. प्रगती अॅग्रो सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर गुरुवारी वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीज या तीन बियाणे कंपन्यांविरुद्ध बार्शीटाकळी तालुक्यात खटले दाखल करण्यात आले आहेत.
वरदान बायोटेक, केडीएम सिड्स व महाबीज या कंपन्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता कमी असल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मूर्तिजापूर येथे दोन कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहे.
- मुरलीधर इंगळे,
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला