विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दंगलग्रस्त भागाची करणार पाहणी
By आशीष गावंडे | Published: May 18, 2023 05:48 PM2023-05-18T17:48:17+5:302023-05-18T17:48:56+5:30
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अकोला : शहरात 13 मे रोजी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे १९ मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जुने शहरातील हरिहर पेठ परिसरातील दंगलग्रस्त भागात पाहणी करून काही कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
समाजमाध्यमांवर धार्मिक भावना दुखावल्याची पोस्ट व्हायरल झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत जुने शहरातील एका विशिष्ट समुदायाने हरिअर पेठ परिसरातील अनेक धार्मिक स्थळांना तसेच रहिवाशी वस्त्यांना लक्ष्य करीत मोठ्या प्रमाणात दगडफेक व जाळपोळ केली होती. या घटनेत विलास गायकवाड नामक युवकाचा मृत्यू झाला. वर्तमानस्थितीत शहरात संचारबंदी तसेच जमावबंदीचा आदेश लागू आहे. दरम्यान, या घटनेतील जखमी नागरिकांची व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या शुक्रवारी शहरात दाखल होत आहेत. यावेळी ते श्री राजराजेश्वर मंदीराला भेट देणार आहेत. दंगलग्रस्त भागाची पाहणी करून नागरीकांशी संवाद साधतील. त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसांच्या समवेत कायदा व सुव्यवस्थेविषयी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत.