शेतकऱ्याच्या मुलाची झेप : राजू केंद्रे लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचा फेलाे
By राजेश शेगोकार | Published: April 21, 2023 05:14 PM2023-04-21T17:14:33+5:302023-04-21T17:14:58+5:30
राजूच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे.
अकाेला : लंडनच्या रॉयल सोसायटी ॲाफ आर्ट्स मार्फत बुलढाण्यातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांची फेला म्हणून निवड करण्यात आली आहे. राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे ह्या छोट्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. राजूच्या आई वडिलांचे शिक्षण प्राथमिक ही झालेलं नाहीये. राजूच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजू यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं.
पुढे उच्च महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करावं लागलं. मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्रच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम केले. आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचे. त्यामुळेच शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचं राजू यांनी ठरवले.
पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या ह्या अनुभवातूनच त्यांना एकलव्य फौंडेशनची सुरुवात केली. २९ वर्षीय राजू सध्या एकलव्य फॉउंडेशनच्या माध्यमातून पूर्णवेळ ग्रामीण वंचित समुदायांसाठी कार्यरत आहे. भटक्या समाजातील आणि शेतकरी पुत्राला अशा यादीत कदाचित पहिल्यांदाच हा मान मिळत असल्याची भावना त्यांच्या गावामध्ये व्यक्त होत आहे.
राजू यांनी मागच्या वर्षी SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित ‘चेवनिंग स्कॉलरशिप’ वर एमएससी डेव्हलपमेंट स्टडीज पूर्ण केले तिथे त्यांनी उच्च शिक्षण व असमानता या विषयावर संशोधन केले आहे.राजू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीडिश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट येथील फेलो म्हणून पण निवडले, ऑक्सफर्ड, टेड सारख्या प्लॅटफॉर्म वर आमंत्रित केले. मागच्या वर्षी प्रतिष्ठित अशा 'फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांना ३० प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केलं होत.