रजेवर प्रश्नचिन्ह; उपायुक्तांना बजावली ‘शाे काॅज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:09+5:302021-09-09T04:24:09+5:30
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. असे असले तरी प्रभारी उपायुक्त वैभव आवारे, सहायक ...
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. असे असले तरी प्रभारी उपायुक्त वैभव आवारे, सहायक आयुक्त पूनम कळंबे तसेच स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रभारी आयुक्त निमा अराेरा प्रशासनाची गाडी रुळावर आणण्याचा कसाेशीने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मनपाच्या उपायुक्तपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या पंकज जावळे यांनी अवघ्या वीस दिवसांतच त्यांच्या विशिष्ट कार्यप्रणालीने प्रशासनाचे कामकाज गतिमान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या हाेत्या. त्यावेळी आयुक्त निमा अराेरा १५ दिवसांच्या रजेवर गेल्या असता आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार जावळे यांच्याकडे साेपवण्यात आला हाेता. त्यादरम्यान नगररचना विभाग, बांधकाम विभागातील अनेक संवेदनशील प्रकरणे झटपट निकाली काढण्यात आल्याची बाब अराेरा यांच्या निदर्शनास आली हाेती. तेव्हापासूनच पंकज जावळे यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उपायुक्त जावळे रजेवर गेले आहेत. त्यांनी रजा घेण्यासाठी नमुद केलेले कारण पाहता आयुक्त अराेरा यांनी त्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावल्याने प्रशासकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहेत.
‘शाे काॅज’कशासाठी?
उपायुक्त पंकज जावळे प्रदीर्घ रजेवर असताना त्यांना आयुक्त निमा अराेरा यांनी कारणे दाखवा नाेटीस का बजावली, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहेत. त्यामुळे आयुक्तांनी बजावलेल्या नाेटीसचा ते नेमका कशारितीने खुलासा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता धुरा आवारेंकडे!
मनपात उपायुक्तांची दाेन पदे आहेत. यापैकी एक पद रिक्त असून उर्वरित एका पदावर पंकज जावळे कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपासून निमा अराेरा यांनी प्रशासनाची धुरा प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या खांद्यावर साेपविल्याचे दिसून येते. तसेच सहायक आयुक्त (विकास) पूनम कळंबे यांना आकृतीबंधाची प्रक्रिया पूर्ण करण्यासह बिळात दडून बसलेल्या कामचूकार कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यास भाग पाडण्याची जबाबदारी दिल्याची माहिती आहे.