शहरातील प्रमुख आठ मार्गांवर ‘एलईडी’

By admin | Published: June 7, 2017 01:30 AM2017-06-07T01:30:26+5:302017-06-07T01:30:26+5:30

महापौरांची भूमिका; एलईडीची निविदा रद्द होणार नाही!

'LED' on the main streets of the city | शहरातील प्रमुख आठ मार्गांवर ‘एलईडी’

शहरातील प्रमुख आठ मार्गांवर ‘एलईडी’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील प्रमुख आठ मार्गांवर लवकरच एलईडी पथदिव्यांचा झगमगाट होणार आहे. मध्यंतरी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एलईडीच्या मुद्यावर मनपा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता ही निविदा रद्द होणार असल्याच्या चर्चेने जोर पकडला होता. कंपनीच्यावतीने शहरात एलईडी पथदिवे उभारण्याचे काम वेगात सुरू असून, महापौर विजय अग्रवाल यांनी निविदा रद्द होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे उभारण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून १० कोटींचा निधी मिळविला. या निधीत महापालिका प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद केली. एकूण २० कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख ५० रस्त्यांसह तब्बल ११७ चौकांमध्ये ‘एलईडी’पथदिवे उभारल्या जातील. या कामासाठी प्रशासनाने मे. रॉयल पॉवर टर्नकी इम्प्लिमेंट्स प्रा.लि. पुणे कंपनीची नेमणूक केली आहे. मनपाची स्थापना झाली त्यावेळी प्रमुख मार्गांवर सोडियमचे पिवळे पथदिवे होते. या पथदिव्यांना जादा वीज लागत असल्यामुळे मनपाने २००६-०७ मध्ये एशियन कंपनीसोबत करार करून सीएफएल पथदिवे लावले. सीएफएलमुळे वीज देयकात मोठी बचत होणार असल्याचा दावा कंपनीने केला होता. कालांतराने मनपाकडे देयक थकीत राहत असल्याची सबब पुढे करीत एशियन कंपनीने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी २०१२ मध्ये एशियन कंपनीचा करार रद्द करीत मनपाच्या स्तरावर पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती सोपवली. केंद्रासह राज्यात व महापालिकेत सत्तापरिवर्तन होताच भाजपने लख्ख उजेड देणाऱ्या एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव समोर केला. मनपाने एलईडी पथदिव्यांसाठी मे. रॉयल पॉवर टर्नकी इम्प्लिमेंट्स प्रा.लि. पुणे कंपनीची नेमणूक केली असून, शहरातील प्रमुख ५० मार्गांवर पथदिवे उभारल्या जाणार आहेत.

या रस्त्यांवर होईल उजेड
- श्रीवास्तव चौक ते कस्तुरबा गांधी रुग्णालय जुने शहर
- भिरड हॉटेल ते डाबकी रोड ते कॅनॉल
- अशोक वाटिका ते सरकारी बगिचा
- सिव्हिल लाइन चौक ते जवाहर नगर ते संताजी नगर
- शासकीय दूध डेअरी ते महापारेषण कार्यालय ते मनपा दक्षिण झोन आॅफिस
- जिल्हा सत्र न्यायालय ते हेडगेवार रक्तपेढी
- दगडी पूल ते मोहता मिल ते माळीपुरा
- गोरक्षण रोड

संपूर्ण शहरात एलईडी लाइट लावल्या जातील. त्यामुळे ट्युबलाइट व ‘पंजा’ हद्दपार होईल. शहरात भूमिगत वीज वाहिनीला मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये प्रमुख मार्गांचा समावेश केला जाईल. निविदा रद्द होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सत्ताधारी व प्रशासनाने विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
- विजय अग्रवाल, महापौर

Web Title: 'LED' on the main streets of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.