विधिमंडळाची ‘रोहयो’ समिती ११ ऑक़्टोबरला अकोल्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:28+5:302021-09-26T04:21:28+5:30
अकोला: राज्य विधिमंडळाची रोजगार हमी योजना (रोहयो) समिती ११ ऑक्टोबरपासून तीन दिवसाच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहे. २५ सदस्यीय ...
अकोला: राज्य विधिमंडळाची रोजगार हमी योजना (रोहयो) समिती ११ ऑक्टोबरपासून तीन दिवसाच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहे. २५ सदस्यीय आमदारांच्या या समितीकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या रोजगार हमी याेजनेच्या कामांची तपासणी करण्यात येणार आहे.
राज्य विधिमंडळाची ‘रोहयो’ समिती येत्या ११, १२ व १३ ऑक्टोबर रोजी अशा तीन दिवसाच्या अकोला जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. समितीचे प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य असलेल्या २५ आमदारांचा या समितीमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील तीन दिवसाच्या दौऱ्यात विधिमंडळाच्या रोहयो समितीकडून २०१६ ते २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या कामांवरील निधी खर्चाची माहितीदेखिल या समितीकडून घेण्यात येणार आहे.
‘या’ कामांची केली जाणार तपासणी!
राज्य विधिमंडळाच्या रोहयो समितीकडून रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायती आणि यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या सिंचन विहिरी, शेतरस्ते, शेततळी, रेशीम उद्योग, शौचालयांचे बांधकाम, गोठे आदी कामांची तपासणी करण्यात येणार आहे.
............................................................................................
यंत्रणा लागली कामाला;
माहितीची जुळवाजुळव सुरू!
राज्य विधिमंडळाच्या रोहयो समितीकडून जिल्ह्यातील रोहयो कामांची तपासणी करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागासह, जिल्हा परिषदेतील रोहयो विभाग आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या संबंधित विभाग आणि यंत्रणा कामाला लागल्या असून, रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या कामांसह निधी खर्चाच्या माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.