प्रशासनातल्या लेकींनी केले सावित्रीमाईंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:23+5:302021-01-04T04:16:23+5:30
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, डॉ. स्वप्ना लांडे, डॉ. मीना शिवाल, श्रीमती ...
यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ, डॉ. स्वप्ना लांडे, डॉ. मीना शिवाल, श्रीमती नीता खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी मान्यवर तसेच जिल्हा प्रशासनातील महिला अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत स्वप्ना लांडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनी स्वतःमध्ये बुद्धिप्रामाण्यवादाचा विकास करावा. स्वतःसोबत समाजाला जागरूक करून महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. स्वप्ना लांडे म्हणाल्या की, परंपरा किंवा कुणी तरी सांगते ते सत्य मानू नका. आपल्या बुद्धीला पटत असेल, ते आपल्या हिताचे आणि समाजाच्या हिताचे असेल त्याचाच स्वीकार करा. महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्रास सहन केला. त्यांच्या या त्यागामुळेच आजची स्त्री अंतराळातसुद्धा जाऊ शकली. पण शिक्षण मिळाले तरी स्त्री ज्ञानी झाली असे नव्हे. आजही शिकलेल्या स्त्रियासुद्धा विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून अंधश्रद्धांचा बळी ठरल्या आहेत. नेहमीच सोशिक त्रास सहन करणारी स्त्री ही चांगली अशी समाजाची धारणा राहिलेली आहे. त्यासाठी स्त्रियांनी आपल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन जगणे अधिकाधिक सहज सोप करावे, हे जीवन परस्परपूरक सहजीवन असावे. असेच सहजीवन हे महात्मा फुले व सावित्रीबाईंचे होते, असे डॉ. लांडे म्हणाल्या. आपल्या व्याख्यानात त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अनेक प्रेरक प्रसंगांचे दाखलेही उपस्थितांना दिले.
या कार्यक्रमात नायब तहसीलदार स्नेहा गिरिगोसावी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना शिवाल, कविता बडगे, शीतल शर्मा यांनीही आपले विचार मांडले. प्रत्येकीने सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा गौरव करून स्त्रियांनी त्यांच्या विचार आणि कर्तृत्वाचा वारसा चालवावा, असे आवाहन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी यानिमित्त संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला या सामाजिक संस्थेच्या वतीने सुरू होत असलेल्या महिला सक्षमीकरण सप्ताहाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. येत्या १२ जानेवारीपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अधीक्षक मीरा पागोर यांनी तर सूत्रसंचालन पल्लवी काळे यांनी केले.