लॉकडाऊनमुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:50+5:302021-04-25T04:17:50+5:30

राहुल सोनोने लोकमत न्यूज नेटवर्क वाडेगाव : गत काही वर्षांपासून येथील लिंबूच्या उत्पादनाने येथील शेतकऱ्यांनी वाडेगावचे नाव राज्यासह देशभरात ...

Lemon growers in crisis due to lockdown | लॉकडाऊनमुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात!

लॉकडाऊनमुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात!

Next

राहुल सोनोने

लोकमत न्यूज नेटवर्क

वाडेगाव : गत काही वर्षांपासून येथील लिंबूच्या उत्पादनाने येथील शेतकऱ्यांनी वाडेगावचे नाव राज्यासह देशभरात पोहोचवले आहे. जिल्ह्यातील इतर भागांच्या तुलनेत येथे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, बहुतांश शेतकरी लिंबू पिकाचे उत्पादन घेतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भावात घसरण झाली असून, लाखोंचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात बागायतदार शेतकऱ्यांकडून प्रामुख्याने लिंबूचे पीक घेतले जाते. सद्यस्थितीत येथील मार्केेटमध्ये लिंबू पिकाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध मोठमोठ्या बाजारपेठेत लिंबू पोहोचत आहे. येथील मार्केटमध्ये पातूर व बाळापूर तालुक्यासह इतर ठिकाणाहूनही लिंबू विक्रीसाठी येत आहेत. यंदा झाडांना बहर असल्याने उत्पादन चांगले होणार, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल कुठे विकावा, असा प्रश्न पडला आहे. शेतामध्ये लिंबू पिकांच्या आंतर मशागतीमध्ये ओलीत व्यवस्थापन करताना कधी पाण्याचा तुटवडा तर वीज पुर‌वठ्याची समस्या निर्माण होते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन घेताना तारेवरची कसरत करावी लागते. वातावरणातील बदलांमुळेही पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकरी लिंबूचे उत्पादन घेतात. सध्या जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूदरही वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे बाजारपेठ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)

---------------------------------------

यंदा लिंबूचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे; मात्र लॉकडाऊनमुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

- शिवा अरुण हुसे, लिंबू उत्पादक शेतकरी

--------------------------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत बाजारपेठ सुरू करावी.

- सचिन तिडके, लिंबू उत्पादक शेतकरी.

----------------------------

लॉकडाऊनपूर्वी लिंबूला मिळत असलेला भाव

५०० रुपये कट्टे

लॉकडाऊननंतरचा भाव

२५० रुपये कट्टे

------------------------------

Web Title: Lemon growers in crisis due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.