बिबट्याच्या ‘त्या’ बछड्यांना ११ दिवसांपासून आईची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:49 AM2020-07-12T10:49:35+5:302020-07-12T10:51:58+5:30
११ दिवस उलटूनही बिबट मादी बछड्यांकडे परतली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पास्टुल येथील गावकऱ्यांना ३० जून दुपारी २ वाजता बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. हे बछडे वन विभागाने ताब्यात घेतले आणि काही दिवसांपासून जंगलातच ठिय्या देऊन बिबट मादीची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु ११ दिवस उलटूनही बिबट मादी बछड्यांकडे परतली नाही. त्यामुळे बछड्यांना कसे सोडावे, अशी अशी चिंता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतावत आहेत.
पास्टुल गावाच्या नदीच्या झुडपाजवळ ३० जून रोजी बिबट्याचे तीन बछडे गावकºयांना दिसले होते. गावकºयांनी ही माहिती पातूर वन विभागाला दिली. वन विभागाने त्या ठिकाणी धाव घेत, बिबट्याच्या बछड्यांना ताब्यात घेतले; परंतु बछड्यांना जन्म देणारी बिबट मादी दिसून न आल्यामुळे वन विभागाने या ठिकाणी बछड्यांसह बिबट मादीच्या प्रतीक्षेत ठिय्या दिला आहे. अकरा दिवस उलटूनही बिबट मादी परतली नाही. वन विभागाचे अधिकारी चातकासारखी बिबट मादीची वाट पाहत आहे. बिबट मादीची दररोज रात्रंदिवस वाट पाहिली जात आहे. वन विभागाचे कर्मचारी दूध पाजून बछड्यांना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिबट मादी परतली नाही तर तिच्या बछड्यांना नागपूरला हलविण्यात येणार आहे. आणखी दोन दिवस या ठिकाणी बिबट मादीची प्रतीक्षा केली जाईल. त्यानंतरही मादी बछड्यांच्या ओढीने परतली नाही तर बछड्यांना नागपूरला सोडण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून वन विभागाचे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी या ठिकाणी भेटी देत आहेत; मात्र त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
त्यामुळे बिबट मादी परतत नसल्याचे जाणकारांचे मत!
माणसांचा स्पर्श बछड्यांना झाल्यामुळे बिबट मादी, त्या तीन बछड्यांकडे परत येत नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. बिबट्याच्या बछड्यांबाबत वन विभाग कमालीची गुप्तता पाळत आहे. अकरा दिवसांपासून या तीनही बछड्यांची बिबट मादी त्यांना घ्यायला आली किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.