सातपुड्याच्या पायथ्याशी शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:20 PM2019-07-11T14:20:11+5:302019-07-11T14:21:00+5:30
सुटका करताना तडफडून मृत्यू
- विजय शिंदे
अकोटः मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सातपुड्याच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. फासकीतून सुटका करुन घेण्यासाठी धडपडत असताना बिबट्याने जीव गमावला.
सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात बिबट्या, वाघ आणि इतर वन्य प्राणी आहेत. विविध कारणांमुळे बिबट्या, वाघ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नदी, नाले आणि गाव-वस्त्यांकडे धाव घेत आहेत. तेल्हारा तालुक्यातील खंडाळा गावाच्या लगत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जमुना नदीमध्ये शिकार्यांनी बिबट्याच्या शिकारीसाठी फास लावला होता. त्यामध्ये बिबट्या अडकला. या फासातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करत असताना बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूबद्दल वन विभागानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
या घटनेमुळे बिबट्या, वाघाचे अधिवास क्षेत्र शिकाऱ्यांना माहीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा मार्ग, त्या मार्गावरुन येण्याची त्यांची वेळ याची अचूक माहिती शिकाऱ्यांकडे असल्याचे याआधीही वारंवार अधोरेखित झाले होते. आतापर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.