भेंडगाव शेतशिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:35+5:302020-12-14T04:32:35+5:30
भेंडगाव : भेंडगाव, भेंडी, महाल शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. गावानजीक असलेल्या शेतात १२ डिसेंबर रोजी शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याने ...
भेंडगाव : भेंडगाव, भेंडी, महाल शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. गावानजीक असलेल्या शेतात १२ डिसेंबर रोजी शेतकऱ्याला बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महागाव शिवारातील आत्माराम पवार यांच्या शेतातही बिबट्या दिसल्याची घटना १३ डिसेंबर रोजी घडली आहे.
परिसरात सध्या रब्बी हंगामातील पिके अंकुरली असून, पिकांना पाणी देण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. कृषिपंपांना रात्रीचा वीजपुरवठा असल्याने १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतकरी शेतात पाणी देत असताना त्याला बिबट्या दिसला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने शेजारील शेतकऱ्यांना कळविले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पिंजर पोलीस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदारांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले असता ते बिबट्याचे असल्याचे आरएफओ डांगे व वनपाल राजू राठर यांनी दिली. शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याची वार्ता पसरताच शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (फोटो)
---------------------
रात्रीचा वीजपुरवठा असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका
भेंगवाड शेतशिवारात कृषिपंपांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. कृषिपंपांना रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात टाकून रात्री पाणी देत आहे. त्यामुळे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी होत आहे.