चतारी परिसरात बिबट्याचा वावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:08+5:302020-12-15T04:35:08+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम चतारी येथे बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम चतारी येथे बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चतारी येथील रुग्णालय परिसरातील शासकीय क्वॉर्टरमधील रहिवासी लखन बनसोड यास ११ डिसेंबरच्या रात्री बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने लखन बनसोड यांना पाहताच त्यांच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केला; मात्र समयसूचकता दाखवून लखन बनसोड यांनी घरात प्रवेश केला व दरवाजा बंद केला. याबाबत त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माहोरे यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. दरम्यान, डॉ. माहोरे यांनी संबंधित घटनेबाबत पोलीसपाटील विजय सरदार यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसपाटील विजय सरदार व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेत बनसोड यांची विचारपूस केली. त्यानंतर आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांना माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक लखन खोकड व वनविभागाचे अन्य कर्मचारी पोलीसपाटील तसेच वन्यजीवप्रेमी, अमर लखाडे, गणेश उमाळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु आढळून आला नाही. याबाबत गावात माहिती पसरताच शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने लक्ष देऊन तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
----------------
या परिसरात काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे तसेच पिंपळखुटा परिसरात दोन बिबटे आढळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला सूचना द्यावी. शोधमोहीम सुरू आहे.
- सतीश नालिंदे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव