‘कृषी’ला कमी निधी; जिल्हा परिषदच्या सभेत वादंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:24 AM2020-06-13T10:24:05+5:302020-06-13T10:24:21+5:30
कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, निधी वाढवून देण्याची मागणी केली.
अकोला : जिल्हा परिषदेच्या ‘बजेट’मध्ये कृषी विभागाच्या योजनांसाठी कमी निधी मिळाल्याच्या मुद्यावर शुक्रवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, निधी वाढवून देण्याची मागणी केली. या मुद्यावरील चर्चेत सभेत काही काळ वादंग झाल्याने कृषी समितीची सभा चांगलीच गाजली.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यासाठी कृषी विभागाला ७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी असताना, जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात (बजेट) कृषी विभागाला २ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. कृषी विभागाच्या योजनांसाठी निधी कमी मिळाल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली. या मुद्यावरील चर्चेत निधी वाढवून देण्याची मागणी सदस्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया योजनांसाठी तडजोड केली जाणार नसून, जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत कृषी विभागाला निधी वाढवून देण्याचा प्रश्न लावून धरण्याचा निर्धारही सदस्यांनी सभेत व्यक्त केला.
या विषयावरील चर्चेत काही काळ वादंग झाल्याने कृषी समितीची सभा गाजली. जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य मोहित तिडके, संजय अढाऊ, अनंत अवचार, अर्चना राऊत, नीता गवई, गीता मोरे, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बियाणे वाटपासाठी २६ हजार अर्ज; १,१०० शेतकºयाची निवड कशी करणार?
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत १५ लाख रुपयांच्या निधीतून शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १ हजार १०० लाभार्थी शेतकºयांची निवड करावयाची आहे; परंतु या योजनेंतर्गत २६ हजार शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यामधून १ हजार १०० लाभार्थी शेतकºयांची निवड कशी करणार, असा प्रश्न कृषी समितीच्या सदस्यांनी सभेत उपस्थित केला.