स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:25 AM2021-08-17T04:25:02+5:302021-08-17T04:25:02+5:30
अकोला : भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्यामध्ये सामान्य माणसांचे ...
अकोला : भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्यामध्ये सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन प्राधान्याने सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल, अशी घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी रविवार, १५ ऑगस्ट रोजी येथे केली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री तसेच माजी आमदार तुकाराम बिरकड, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. संतोष कोरपे, स्वातंत्र्य सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पोलीस वाद्यवृंदाने वाजवलेल्या राष्ट्रगीताच्या धुनवर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या संबोधनात सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सैनिक, देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणारे सीमेवरील जवान व शहिदांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन शेखर गाडगे यांनी केले.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला
करण्यासाठी प्रशासन सज्ज !
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, सेवाभावी संस्थांनी चांगले काम केले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये अशी प्रार्थनाही आपण करू, असेही त्यांनी सांगितले.
बेघरांसाठी ‘गाडगेबाबा घरकूल
प्रकल्प कार्यान्वित करणार !
स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करण्यात येणार असून, त्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतांनाच, बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकूल’ हा प्रकल्प कार्यान्वित करू. अनाथांनाही हक्काचे घर देण्यात येणार असून, सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.