चला रक्तदान करुया... रुग्णांचे प्राण वाचवूया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:01 AM2021-06-29T11:01:26+5:302021-06-29T11:07:53+5:30
Let's donate blood ... let's save the lives of patient : रक्तपेढ्यांमध्ये तीन ते चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे.
अकोला: जिल्ह्यात कोविडचा शिरकाव झाल्यानंतर रक्तसंकलनाला मोठा फटका बसला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, रक्तपेढ्यांमध्ये तीन ते चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. या काळात रक्त संकलनात मोठी घट झाल्याने गंभीर रुग्णांसोबतच सिकलसेल, थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येकाने रक्तदानासाठी एक पाऊल उचलूया, असे आवाहन रक्तदात्यांकडून केले जात आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्टोबरनंतर परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरूवात झाल्याने रक्तदान शिबिरे, सार्वजनिक कार्यक्रम आदींवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात शासकीय रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांची संख्या कमी असली तरी प्रसूती, अपघात आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया तसेच थॅलेसिमिया आणि सिकलसेल या रुग्णांना रक्ताची गरज भासतच आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदात्यांशी संपर्क करून किंवा नातेवाईकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून रक्ताची गरज भागविली जात आहे, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.
रक्ताशी निगडित आजारी जिल्हानिहाय रुग्ण
जिल्हा सिकलसेल - थॅलेसिमिया -हिमोफिलिया
अकोला - १०३ - ३१ - ४२
अमरावती - ४६ - १५ - २०
बुलडाणा - ०४ - १०४ - ०६
वाशिम - ०२ - ७५ - ०४
यवतमाळ - ४१ - १३ - ००
एकूण - १९६ - २३८ -७२
निगेटिव्हसह पॉझिटिव्ह रक्तगटही उपलब्ध नाही
जिल्ह्यात आठ प्रमुख रक्तपेढ्या असून, यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. प्रामुख्याने ए, बी पॉझिटिव्ह, ए, बी, निगेटिव्ह या गटातील रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गत महिनाभरात क्वचितच रक्तसंकलन झाल्याने ही स्थिती ओढवली आहे.
प्रमुख रक्तपेढ्यांची स्थिती
रक्तपेढी - ए( )- ए(-) - बी( ) - बी(-) - एबी( ) - एबी(-) - ओ( ) - ओ(-)
जीएमसी - १० - ० - ९ - ० - ० - १ - ९ - ०
लेडी हार्डींग्स - ८ - ० - २ - ० - १ - ० - ६ - ०
हेडगेवार रक्तपेढी - ० - ० -० -० -० -० - ० - ३
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. काेराेना काळात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा झाल्याने अनेक रूग्णांना वेळेवर रक्त मिळू शकले नाही. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण हाेऊ नये म्हणून रक्तदानासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा.
- पराग गवई, सामाजिक कार्यकर्ता