महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:00+5:302021-07-07T04:23:00+5:30
२०१४ मध्ये भाजपची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता हाेती. यादरम्यान, भाजपने विकास कामांच्या माेठमाेठ्या गप्पा केल्या. प्रत्यक्षात शहरात झालेली विकास ...
२०१४ मध्ये भाजपची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता हाेती. यादरम्यान, भाजपने विकास कामांच्या माेठमाेठ्या गप्पा केल्या. प्रत्यक्षात शहरात झालेली विकास कामे अतिशय दर्जाहीन व तकलादू ठरली असून, शहराचे वाटाेळे करण्यात भाजपच्या नेतृत्वाने काेणतीही कसर साेडली नसल्याची खरमरीत टीका महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केली. मागील सात वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या माध्यमातून भाजपने अनेक घाेटाळे केले असून याेजनांमधील अनियमितता चव्हाट्यावर आली आहे. हा सर्व हिशेब भाजपला मनपाच्या निवडणुकीत चुकता करावा लागेल, असे सांगत, त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची जम्बाे शहर कार्यकारिणी घाेषित केली. यामध्ये ९६ जणांचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेला प्रा. विश्वनाथ कांबळे, शाम बाबू अवस्थी, मंदा देशमुख, रफिक सिद्दीकी, उषा विरक, मनाेज गायकवाड उपस्थित हाेते.
भाजप गवगवा करण्यात पटाइत!
सभागृहात भाजपच्या संख्याबळाच्या तुलनेत आमचे संख्याबळ नगण्य असले तरीही, नियमबाह्य कामांच्यासंदर्भात भाजपला कधीच सहकार्य केले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. काेराेना काळात राष्ट्रवादीने शहरात अनेक गरजूंना मदत केली. आम्हाला दिंडाेरा वाजवण्यापेक्षा समाजकारणात रस आहे. त्याउलट भाजपची स्थिती असून ते गवगवा करण्यात पटाईत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य
राज्यात सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊनच महाविकास आघाडी जन्माला आली. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये हाेऊ घातलेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना व काॅंग्रेसला साेबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयाेग केला जाईल. त्यासाठी इतर पक्षांतील नेत्यांसाेबत संवाद साधण्यात येईल, असे सांगत विजय देशमुख यांनी आघाडीचे संकेत दिले.