दंड भरू पण बाहेर फिरू, विनाकारण फिरणाऱ्यांपुढे यंत्रणा हतबल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:13+5:302021-05-26T04:19:13+5:30
अकोला : जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी देण्यात आली असून ११ नंतर नागरिकांना ...
अकोला : जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी देण्यात आली असून ११ नंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र शहरात अनेक जण आदेशाला झुगारून घराबाहेर पडत आहेत. दंड भरू, पण बाहेर फिरू अशा रिकामटेकड्यांच्या वृत्तीमुळे पोलीस, महसूल, पालिका, आरोग्यासह सर्वच यंत्रणा हतबल होत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकांचा मुक्तसंचार सुरू आहे. अशा रिकामटेकड्यांनाच काेराेनाचा सर्वाधिक धाेका आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला न जुमानता काही महाभाग रस्त्यांवर अकारण फिरताना आढळून येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. आरोग्य, पोलीस व पालिका प्रशासन समजावून, विनंती करून हतबल झाले आहेत.
दवाखान्याचे कारण सर्वाधिक !
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे अनेक जण अकारण फिरताना आढळून आले. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत अनेकांनी एकसारखीच कारणे सांगितली. कोणी म्हणाले, दवाखान्यात जातोय तर कोणी म्हणाले, मेडिकलला जातो. शहरातील काही चौकांत पोलिसांनी या रिकामटेकड्यांवर कारवाई केली. यामध्ये काही नागरिकांनी दवाखान्याची चिठ्ठी तर काहींनी औषधे दाखविली. वेगवेगळी कारणे दाखवून अनेक जण सुटका करवून घेत होते.
भटकणाऱ्यांची अँटिजन चाचणीही केली
अनेक शहरांत अकारण भटकणाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या करण्याचा पवित्रा पाेलिसांनी घेतला हाेता. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट सुरू केली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी १५० जणांची टेस्ट करण्यात आली असून, त्यामध्ये चार जणांना जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले हाेते.