अकोल्यात साकारणार ‘लायब्ररी ऑफ कॉन्स्टिट्यूशन’
By Atul.jaiswal | Published: August 23, 2020 10:13 AM2020-08-23T10:13:45+5:302020-08-23T10:16:14+5:30
जगभरातील देशांच्या राज्यघटनांच्या प्रति एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.
- अतुल जयस्वाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इतिहास संशोधक व इतरांना राज्यघटनांचा अभ्यास करता यावा, तसेच संदर्भ मिळविणे सुलभ व्हावे, यासाठी जगभरातील देशांच्या राज्यघटनांच्या प्रति एकाच छताखाली आणण्याचा उपक्रम अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. ‘अकोला स्कूल आॅफ हिस्टरी’ अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या अंतर्गत अकोल्यात ‘लायब्ररी आॅफ कॉन्स्टिट्यूशन’ अर्थात राज्यघटनांचे ग्रंथालय साकारण्यात येणार आहे.
आधुनिक जगात विविध देशांनी त्यांचा राज्यकारभार हाकण्यासाठी लिखित स्वरूपातील राज्यघटनांचा अवलंब केला आहे. जगभरातील कायदे तज्ज्ञ, इतिहास संशोधक, राज्यशास्त्राचे अभ्यासक व विद्यार्थ्यांना विविध संदर्भांसाठी राज्यघटनांचा आधार घ्यावा लागतो. विविध देशांच्या राज्यघटनांच्या प्रति मोठ-मोठ्या ग्रंथालयांमध्ये एकाच ठिकाणी अभावानेच मिळतात. त्यामुळे अभ्यासकांना अडचणीचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने अकोला येथील विश्वास प्रतिष्ठानने ‘अकोला स्कूल आॅफ हिस्टरी’ अंतर्गत ‘लायब्ररी आॅफ कॉन्स्टिट्यूशन’ स्थापन करण्याचे ठरविले असून, त्या दिशेने पाऊल उचलले आहे. विश्वास प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विविध देशांच्या राज्यघटना संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
यासाठी ज्यांच्याकडे राज्यघटना असतील, त्यांनी त्या पाठवाव्यात, असे आवाहन ई-मेल व व्हॉटसअॅपच्या माध्यमातून केले आहे. प्रतिष्ठानचे प्रशांत गावंडे यांनी आतापर्यंत ९०० जणांना ई-मेल पाठविले असून, त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळाल्याचे ते सांगतात. आतापर्यंत जापान, आॅस्ट्रेलिया, फिनलँड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, भारत व पाकिस्तानच्या राज्यघटनांच्या प्रति देण्याचे संबंधितांनी कबूल केले असून, लवकरच या राज्यघटनांच्या प्रति प्राप्त होणार असल्याचे प्रशांत गावंडे यांनी सांगितले.
दूतावासांसोबतही साधणार संपर्क
राज्यघटनांच्या प्रति संकलीत करण्याच्या उद्देशाने विश्वास प्रतिष्ठानचे सदस्य पुढील महिन्यात विविध देशांच्या दूतावासांना भेटी देऊन, त्यांच्याकडून त्यांच्या देशाच्या राज्यघटनांच्या प्रति मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय विविध देशांमधील परिचितांकडूनही राज्यघटनांच्या प्रति मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीला राज्यघटनांचे ग्रंथालय जेआरडी टाटा इंटरनॅशन स्कूल येथे होणार आहे. त्यानंतर यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
राज्यघटनांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एकाच छताखाली विविध देशांच्या राज्यघटना उपलब्ध असाव्या, या कल्पनेतून हा प्रकल्प हाती घेतला आहे. अभ्यासकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. कुणाकडे एखाद्या देशाची राज्यघटना असेल, तर ती आम्हाला पाठवून या कामात आमची मदत करावी.
- प्रशांत गावंडे,
विश्वास प्रतिष्ठान, अकोला.