लायसनची मुदत संपली, अपॉईन्मेंट घेतलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:09+5:302021-06-10T04:14:09+5:30
अकोला : कोरोना या भीषण आजाराची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्यानंतर उपप्रादेशिक, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय कमी अधिकारी ...
अकोला : कोरोना या भीषण आजाराची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्यानंतर उपप्रादेशिक, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय कमी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होती. त्यामुळे बहुतांश कामे प्रलंबित असताना आता जून महिन्यापासून अनलॉकनंतर ही कामे नव्याने सुरू झाली आहेत. मुदत संपलेल्या लायसन धारकांना अपॉईन्मेंट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच वाहनांचे नूतनीकरण, परवान्याचे नूतनीकरण व इतरही प्रक्रिया ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन अपॉईन्मेंट गरजेची असून, कोरोना टेस्टही बंधनकारक करण्यात आलेली आहे.
संचारबंदीचे कडक निर्बंध राज्यात लागू केल्यानंतर शासकीय कार्यालयातील बहुतांश कामे थांबलेली होती. काही कामे ऑनलाईन पद्धतीने सुरू होती; मात्र त्याला प्रतिसाद पाहिजे तसा नव्हता. उपप्रादेशिक परिवहन विभागात नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने सुरू होते; मात्र आता अनलॉकनंतर ही प्रक्रिया जोमाने सुरू करण्यात आलेली आहे. ज्या परवानाधारकांची मुदत संपली त्यांनाही आता नव्याने अपॉईन्मेंट घेऊन नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
अशी घ्या अपॉईन्मेंट
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चार प्रकारांपैकी आपल्याला नेमकी कोणत्या कामासाठी अपॉईन्मेंट हवी आहे. त्यावर क्लिक करावे. त्यानंतर संबंधित कामासाठी अपॉईन्मेंटची वेळ व तारीख देण्यात येईल. अशा पद्धतीचा मेसेज संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावर येणार आहे. त्यानंतर दिलेल्या तारखेला उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करावी.
असा आहे कोटा
उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहन परवाना नूतनीकरण. तसेच नवीन वाहनांची नोंदणी व इतर कामांसाठी दिवसाला १२० जणांचा कोटा फिक्स करण्यात आलेला होता; मात्र आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर हे कामकाज ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ठेवण्यात आलेला कोटा हा गरजेनुसार बदलण्यात येत आहे.
वाहनांची नोंदणी सुरूच
संचारबंदीचे कडक निर्बंध लावल्यानंतरही नवीन वाहनांची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. त्यानंतर आता प्रत्यक्षरीत्या नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. दिवसाला २५ ते ३० वाहनांची नोंदणी करण्यात येत आहे. दोन दिवसांत ७० वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागत महत्त्वाची, तसेच गरजेची कामे असलेल्यांनी यावे. विनाकारण गर्दी करू नये. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ५० टक्के क्षमतेने कामे सुरू करण्यात आलेली आहेत. जीवनावश्यक असलेली कामे तातडीने करण्यात येत आहेत. वाहनचालकांनी व मालकांनी कोरोना नियम पाळूनच कामे करण्यासाठी यावे.
गोपाल वरोकार
सहायक परिवहन अधिकारी
अकोला