कॅशलेस व्यवहार उठला शेतक-यांच्या जीवावर
By admin | Published: January 6, 2017 02:46 AM2017-01-06T02:46:07+5:302017-01-06T02:46:07+5:30
कर्जाची वसुली; शेतमाल विक्रीची जमा रक्कम देण्यावर बँकाचे निर्बंध.
सदानंद सिरसाट
अकोला, दि. ५- तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन न केलेल्या शेतकर्यांना चालू वर्षात बँकांनी पीक कर्ज तर दिलेच नाही. आता कॅशलेस व्यवहारामुळे त्या थकीत शेतकर्यांना शेतमालाची रक्कम धनादेशाने दिली जात आहे. जमा होणारी रक्कम खात्यातून काढण्यास बँकांनी निर्बंध लावल्याने हजारो शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. हा प्रकार घडलेल्या गांधीग्राम येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत धाव घेतलेल्या शेतकर्यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, अशी तंबीच देण्यात आल्याने ते हवालदिल झाले आहेत.ै
गेल्या २00९ पासून जिल्हय़ात पावसाच्या लहरीपणामुळे सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे २0१६ पर्यंतच्या सर्वच हंगामात शेतकर्यांना पीक कर्जाच्या रकमेची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यावर उपाय म्हणून शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यांना नव्याने कर्ज देण्यात आले; मात्र त्यावेळी काही शेतकर्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले नाही. नवीन कर्जही घेतले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी २0१४-१५ पर्यंत थकीत झाले. चालू वर्षात २0१६-१७ च्या खरीप, रब्बी हंगामातही शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यामध्ये दरवर्षी कर्ज घेतले; पण ते थकीत असलेल्या शेतकर्यांनाच पुनर्गठनाचा लाभ देण्यात आला. ज्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन केले नाही. आधीच्या वर्षी घेतलेले कर्ज दुसर्या वर्षी थकीत ठेवले, त्यांना चालू वर्षातही बँकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे अकोला जिल्हय़ातच हजारो शेतकरी वंचित राहिले.
आता शेतमालाची रक्कम मिळणेही कठीण
शेतकर्यांची एकदा घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम थकीत असल्याने ती वसूल करण्याची कारवाई बँकांनी सुरू केली आहे. त्यातच आता कॅशलेस व्यवहार असल्याने शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारेच दिली जात आहे. त्या धनादेशाची रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर शेतकर्यांना ती काढता येत नाही. त्यावर बँकांनी निर्बंध लावले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांना तुम्ही काहीही करा, थकीत कर्ज भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अशी तंबी बँकेचे अधिकारी देत आहेत.
शासनाचा रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव
राज्यभरात लाखो शेतकरी या तांत्रिक मुद्यामुळे पीक कर्जापासून वंचित होते. त्यावर शासनाने रिझर्व्ह बँकेकडे या शेतकर्यांना कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश देण्याची मागणी प्रस्तावाद्वारे केली होती; मात्र त्यावर काहीच निर्देश न मिळाल्याने शेतकरी वंचितच आहे.
गांधीग्राम येथे घडला प्रकार
शेतकर्यांनी कापसाच्या विक्रीतून मिळालेला धनादेश बँकेत जमा केला. त्याची रक्कमही बँकेत जमा झाली. ती काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकर्यांना कर्ज भरल्याशिवाय रक्कम मिळणार नाही, असे शाखाधिकारी, वसुली अधिकारी यांनी सांगितले. एटीएम कार्डचा वापर करूनही ती निघत नाही. त्यामुळे शेतकरी आता बिथरले आहेत. पाच शेतकर्यांसोबत हा प्रकार घडला आहे.