आयटीआय प्रशिक्षणार्थींना जीवन गट विम्याचे कवच!
By admin | Published: June 29, 2017 01:32 AM2017-06-29T01:32:15+5:302017-06-29T01:32:15+5:30
गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पाठपुरावा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील प्रवेशीत प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदा शैक्षणिक वर्षापासून जीवन गट विमा योजना शासनाने लागू केली आहे. यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ही योजना लागू करून घेतली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेताना अनेकदा जोखमीचे व धोकादायक यंत्र हाताळावे लागतात. हे यंत्र हाताळताना अनेकदा अपघात घडून विद्यार्थ्यांवर मृत्यूचासुद्धा प्रसंग ओढावतो. त्यामुळे आयटीआय व तांत्रिक विद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवन गट विम्याच्या माध्यमातून सुरक्षा कवच लाभावे, यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन ही योजना अमलात यावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. बुधवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध घटकांचा आढावा घेतला. या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. पाटील यांनी महाजन समिती अहवाल तसेच गेडाम समिती अहवालांची सद्यस्थिती, समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली कार्यवाही आणि विलंबाची कारणे, सेंटर आॅफ एक्सलन्स (सीओई) अंतर्गत अॅडव्हान्स मॉड्युलरचे सीटीएसमध्ये रूपांतर करण्याबाबत आणि या योजनेतील मंजूर पदांचे समायोजन याबाबत सद्यस्थिती, तासिका तत्त्वावरील निदेशकांचे मानधन वाढविणे, गट-अ ते गट-क पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरणे याचीही माहिती डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतली.
द्विस्तरीय अभ्यासक्रम बदलण्याची गरज!
द्विस्तरीय अभ्यासक्रम प्रक्रिया संपूर्ण बदलण्याची गरज असून, राज्यातील कमी मागणीचे अभ्यासक्रम असलेल्या ५३२ तुकड्या या जास्त मागणीच्या अभ्यासक्रमासाठी वर्ग करणे, यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.