दोन्ही आरोपींना जन्मठेप
By admin | Published: December 18, 2014 12:58 AM2014-12-18T00:58:35+5:302014-12-18T00:58:35+5:30
माजी आमदाराच्या स्वीय सचिवाचे खून प्रकरण.
अकोला: माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे स्वीय सचिव ज्ञानेश्वर वानखडे यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी शैलेश रामसिंग राठोड (४१) व त्याचा भाचा यशपाल मदनलाल जाधव (२१) यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी दीड लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे स्वीय सचिव ज्ञानेश्वर वानखडे यांची ९ नोव्हेंबर २0१३ रोजी निर्घृण हत्या झाली होती. घटनेच्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता अकोल्यातील जागृती विद्यालयाजवळील बिरकड यांच्या कार्यालयासमोर आरोपी शैलेश राठोड व यशपाल जाधव यांनी लोखंडी पाईप आणि कत्त्याने ज्ञानेश्वरवर वार केले. बिरकड यांच्या कुंभारी येथील शाळेतील शिपाई नारायण महादेव धनागरे आरोपींना आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी त्याला बाजूला ढकलले. ज्ञानेश्वर रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर, आरोपी घटनास्थळाहून पळून गेले. तुकाराम बिरकड घटनास्थळी पोहोचल्यानंतर, ज्ञानेश्वरला रुग्णालयात भरती करण्यात आले. उ पचारादरम्यान दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. नारायण धनागरे याने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर भादंवि कलम ३0२ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शैलेश राठोड याला घटनेच्या दिवशी, तर दुसर्या दिवशी त्याचा भाचा यशपाल याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून रक्ताने माखलेले कपडे, लोखंडी पाईप व कत्ता जप्त केला. एपीआय शेळके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सुभाष काटे यांनी तर आरोपींतर्फे अँड. मोहन मोयल, अँड. दिनेश खुराणिया यांनी बाजू मांडली.