कुऱ्हाडीने घातले घाव; न्यायालयाने ठाेठावली जन्मठेप, बाळापूर तालुक्यातील घटना
By आशीष गावंडे | Published: April 8, 2024 09:39 PM2024-04-08T21:39:01+5:302024-04-08T21:40:21+5:30
कलम ५०६ अंतर्गत २ वर्षाचा कारावास ठाेठावला.
अकाेला: जुन्या वादातून कु-हाडीने घाव घालून रामकिशोर सुरजप्रसाद राजपुत यांची हत्या करणारा आराेपी राहुल उर्फ गेंडा मोहन गवारगुरु याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती शयना पाटील यांनी भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ अंतर्गत २ वर्षाचा कारावास ठाेठावला.
सुमारे चार वर्षांपूर्वी ९ नाेव्हेंबर २०२० रोजी राहुल उर्फ गेंडा मोहन गवारगुरु रा.काेळासा, ता.मुर्तिजापूर जि.अकाेला याने जुन्या वादातून रामकिशोर सुरजप्रसाद राजपुत यांच्यावर प्रकाश वानखडे व गव्हांदे यांच्या घराजवळ कु-हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले हाेते. स्थानिक नागरिकांनी अडवले असता, त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत आराेपी राहुल गवारगुरू निघून गेला. याप्रकरणी मृतकाची सासू , मुलीने जखमी अवस्थेतील रामकिशाेर यांना बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी त्यांला मृत घोषीत केले. यामुळे मृतकाची सासु तायराबी उर्फ ताराबाई तुराबशहा यांच्या फिर्यादीवरुन बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी राहुल उर्फ गेंडा मोहन गवारगुरु व आरोपी राष्ट्रपाल उर्फ जग्गु सुखदेव सिरसाठ यांनी कट रचुन मृतकाला ठार केले. यामुळे कलम ३०२, ५०६, १२०-ब, ३४ नुसार गुन्हा दाखल केला हाेता. गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांनी करुन न्यायालयाल दोषारोपपत्र दाखल केले हाेते.
साक्ष ठरली महत्वाची
या प्रकरणी सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. मृतकाची सासु व फिर्यादी तसेच इतर तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, डॉक्टर व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाचे पुरावे ग्राहय मानुन दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी राहुल गवारगुरु याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दुसरा आराेपी राष्ट्रपाल उर्फ जग्गु सुखदेव सिरसाठ यास सबळ पुराव्याअभावी सोडुन देण्यात आले. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. बाळापूरचे पाेलिस स्टेशनचे कोर्ट पैरवी रेखा हातोलकर, एच.सी. संतोष उंबरकार यांनी सहकार्य केले.