पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस आजीवन कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाेठावली शिक्षा
By आशीष गावंडे | Published: August 8, 2024 08:11 PM2024-08-08T20:11:10+5:302024-08-08T20:11:44+5:30
आरोपी माेहन हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करायचा.
आशिष गावंडे/ अकोला: घरामध्ये स्वयंपाक करीत असलेल्या पत्नीसाेबत वाद घालून तीच्या अंगावर घासलेट टाकून तीला जीवंत जाळणाऱ्या संशयीवृत्तीच्या पतीला आजीवन कारावासाची शिक्षा ठाेठावण्यात आली. गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक -२ श्रीमती एस.सी. जाधव यांनी शिक्षा सुनावली.
मोहन विक्रम डोंगरे (वय ५५ रा. इंदिरा नगर झोपडपट्टी, वाडेगाव ता. बाळापूर, जि. अकोला) असे शिक्षा ठाेठावण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आरोपी माेहन हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करायचा. २९ मे २०१४ रोजी आरोपीने त्याची पत्नी स्वयंपाक करीत असतांना, तिच्यासोबत वाद घातला व त्यानंतर पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून तिला पेटवून दिले. ही बाब मुलाच्या लक्षात येताच त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमी आइला रुग्णालयात भरती केले. त्यावेळी गंभीररित्या भाजलेल्या महिलेने तहसिलदारांना मृत्युपूर्व बयान दिले हाेते. त्या बयानवरुन आराेपी माेहन डाेंगरे याच्या विराेधात बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक जी.एम. गुरुकर यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्यासाठी फिर्यादीसह एकुण ११ साक्षीदार तपासले. तसेच बचाव पक्षानेही आराेपीच्या दुस-या मुलासह इतर एका साक्षीदारास तपासले. जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन आरोपीस कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर यांनी बाजू मांडली. तसेच हेड कॉन्स्टेबल रेखा हातोलकर व सीएमएस सेलचे संतोष उंबरकर यांनी सहकार्य केले.