पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:47 PM2019-12-31T17:47:07+5:302019-12-31T17:47:19+5:30
दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी रेल्वे येथील रहिवासी पतीने पत्नीला जिवंत जाळल्यानंतर हत्येच्या आरोपाखाली आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी रेल्वे येथील रहिवासी पतीने पत्नीला जिवंत जाळल्यानंतर हत्येच्या आरोपाखाली आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आकोश उर्फ अशोक धनराज कीरडे असे आरोपीचे नाव असून त्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
करतवाडी रेल्वे येथील रहिवासी आकोश उर्फ अशोक धनराज कीरडे (४०) याने त्याची पत्नी मंगला आकोश कीरडे हीच्या चारीत्र्यावर संशय घेउन तीला ३१ जानेवारी २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास अंगावर रॉकेल टाकुन पेटविले होते. यामध्ये मंगला यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक सुरेश शंकरराव एकीरे यांनी दहीहांडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी आकोश उर्फ अशोक धनराज कीरडे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पीएसआय सतीष दोनकलवार यांनी करून दोषारोपपत्र आकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर आकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपीस भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणूण पोलीस कर्मचारी अरुण तेलगोटे यांनी कामकाज पाहीले.