सहा आरोपींना जन्मठेप

By admin | Published: December 2, 2015 02:42 AM2015-12-02T02:42:09+5:302015-12-02T03:15:52+5:30

अकोला जिल्ह्यातील नेव्होरी हत्याकांड; दुस-या गुन्ह्यातील आरोपींची सुटका.

Life imprisonment for six accused | सहा आरोपींना जन्मठेप

सहा आरोपींना जन्मठेप

Next

आकोट (अकोला): आकोट तालुक्यातील नेव्होरी येथे गणपती विसर्जन वादातून १७ वर्षांंंपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील सहा आरोपींना मंगळवारी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आकोट तालुक्यातील ग्राम नेव्होरी येथे ३ सप्टेंबर १९९८ रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील इंगळे आणि मामनकर यांच्यात वाद झाला होता. मिरवणुकीमध्ये मुकुंद प्रल्हाद मामनकर हा दोन्ही बाजूला पेटलेली मशाल फिरवत होता. पांडुरंग चंद्रभान इंगळे यांनी त्यांचे घर कुडाचे असल्याने मशाल फिरविण्यावर आक्षेप घेतला; मात्र त्याने मशाल फिरविणे सुरूच ठेवले आणि त्यामुळे साहेबराव इंगळे यांच्या घरावरील कुडाने पेट घेतला. यातून त्यांच्यात वाद झाला आणि काही वेळाने मामनकर यांच्या गटाने इंगळे आणि त्यांच्या सहकार्‍यांवर हल्ला केला. हल्ल्यात पांडुरंग चंद्रभान इंगळे, दामोदर चंद्रभान इंगळे, गणेश पांडुरंग इंगळे हे जखमी झाले. त्यापैकी पांडुरंग चंद्रभान इंगळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गोविंद अण्णा इंगळे यांच्या फिर्यादीवरून आकोट पोलीस ठाण्यात १७ जणांविरुद्ध भादंविचे कलम ३0२ (खून करणे), ३0७ (प्राणघातक हल्ला) १४७, १४८, १४९, १३५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुरूवातीची सात वर्षे या प्रकरणी अकोला येथील न्यायालयात सुनावणी झाली. आकोट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाल्यानंतर हा खटला तेथे वर्ग करण्यात आला. आकोट येथे आणखी १0 वर्षे सुनावणी चालली. सरकारी पक्षातर्फे चार प्रत्यक्ष साक्षीदार, तसेच वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकार्‍याची साक्ष नोंदविण्यात आली. ती ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे अँड. प्रवीण चिंचोले आणि अँड. जयकृष्ण गावंडे यांनी काम पाहिले. अँड. सुभाष काटे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींतर्फे अँड. मोहन मोयल यांनी काम पाहिले. पुंडलिक गुणवंत मामनकर, शेषराव पुंडलिक वसू, राजेंद्र प्रल्हाद मामनकर, श्रीकृष्ण रामराव मामनकर, गोपाळ रामराव मामनकर, मुकुंद प्रल्हाद मामनकर यांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असून, दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये मृतकाच्या वारसांना, तर जखमींना प्रत्येकी २0 हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ११ जणांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Life imprisonment for six accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.