पत्रकारितेचे आयुष्य विश्‍वासार्हतेवर अवलंबून

By admin | Published: March 27, 2017 02:53 AM2017-03-27T02:53:02+5:302017-03-27T02:53:02+5:30

कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिपादन; पत्रकारांचे जिल्हा अधिवेशन.

The life of journalism depends on credibility | पत्रकारितेचे आयुष्य विश्‍वासार्हतेवर अवलंबून

पत्रकारितेचे आयुष्य विश्‍वासार्हतेवर अवलंबून

Next

अकोला, दि. २६- वस्तुस्थिती असेल तीच माहिती आली तरच विश्‍वासार्हता वाढते, अन्यथा पत्रकारावर संशय व्यक्त केला जातो. पत्रकारितेचे आयुष्य विश्‍वासार्हतेवर अवलंबून आहे. त्यामुळे पत्रकारांनी ती जपली पाहिजे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब ऊर्फ पांडुरंग फुंडकर यांनी केले. निमवाडीस्थित मा.ब्रा. संस्कृती विद्यालयात रविवारी पत्रकारांचे जिल्हा अधिवेशन झाले. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रातील उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलाने अधिवेशनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरिश पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, वरिष्ठ पत्रकार प्रसाद काथे, माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
मुंबई मंत्रालयात शेतकर्‍याला झालेली मारहाण या विषयाचे सूत्र धरून कृषिमंत्री फुंडकरांनी वस्तुस्थिती आणि विपर्यास यावर विवेचन केले. शेतकर्‍याने सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घातली. ही वस्तुस्थिती असताना वेगळ्य़ाच प्रकारच्या बातम्या उमटल्या. पत्रकारिता बदलत आहे तसे होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकारांचा धर्म वेगळा असतो. इतरांच्या समस्या सोडविताना त्यांच्या समस्या मागे पडतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो; पण काही पत्रकार इतरांसाठी समस्या होत आहेत, अशा कानपिचक्याही मार्गदर्शन करताना खा. संजय धोत्रे यांनी दिल्या. तंत्रज्ञानाचा वापर कुशल पत्रकारितेसाठी करावा, अधिवेशनाच्या या मंथनातून पत्रकारांनी अमृत काढले असेल, असे मत अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. जिल्हा अधिवेशनाचा समारोप सायंकाळी पालक मंत्री डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. राष्ट्रगीताने अधिवेशाची सांगता झाली. पत्रकाराच्या जिल्हा अधिवेशास माजी आमदार नारायण गव्हाणकर, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, संजय बडोणे, उषा विरक, कृष्णा अंधारे, जगदीश मुरूमकार, धनंजय मिश्रा, अविनाश पाटील, उपायुक्त समाधान सोळंके, किशोर विभुते, प्रकाश मानकर, उमेश टाले, अनिल मावळे, हांडे, राजेंद्र बाहेती यांनीदेखील विशेषकरून हजेरी लावली.

Web Title: The life of journalism depends on credibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.