‘लक्ष्मी’च्या आयुष्याला मिळाला आधार!

By admin | Published: April 14, 2016 01:36 AM2016-04-14T01:36:44+5:302016-04-14T01:36:44+5:30

गुलाबराव गावंडेंनी घेतले दत्तक, कन्यादानासह लग्नाचा खर्च उचलणार!

Life of Lakshmi found support! | ‘लक्ष्मी’च्या आयुष्याला मिळाला आधार!

‘लक्ष्मी’च्या आयुष्याला मिळाला आधार!

Next

सचिन राऊत /अकोला
लग्नाच्या चार दिवसाआधी पित्याचे छत्र हरपलेल्या धारेल येथील लक्ष्मीह्णच्या आयुष्याला माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आधार दिला. तिच्या कन्यादानाची जबाबदारी उचलत गावंडे यांनी लग्नाचा संपूर्ण खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लहान मुलगी उज्ज्वला हिच्या शिक्षणासह इतर खर्चही ते करणार आहेत. लोकमतने बुधवारच्या अंकात या कुटुंबाची व्यथा मांडली होती.
धारेल येथील शेषराव शहादेव ठोसरे यांची मोठी मुलगी लक्ष्मीचे लग्न १६ एप्रिल रोजी होत आहे. लग्नाचा खर्च पाहून खचलेल्या लक्ष्मीच्या वडिलांनी शनिवारी रात्री जाळून घेतले होते. लक्ष्मीचे लग्न चार दिवसांवर असताना तिच्या वडिलांनी अखेरचा श्‍वास घेतला. मुलीच्या लग्नाचे बापाने बघितलेले स्वप्न तो गेल्यानंतर पूर्ण होईल की नाही, ही चिंता कुटुंबियांना होती; मात्र लोकमतने लक्ष्मीची हृदयद्रावक व्यथा समाजासमोर मांडल्यानंतर समाजातील सहृदयी व्यक्ती तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी बाबाचे छत्र हरविलेल्या लक्ष्मीला दत्तक घेत, तिच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. १६ एप्रिल रोजी गुलाबराव गावंडे कुटुंबीयांसह धारेल येथे उपस्थिती लावून लक्ष्मीचे कन्यादान करणार आहेत. लक्ष्मीच्या लग्नानंतर लहान मुलगी उज्ज्वला हिचा शैक्षणिक खर्चही आपण करून, असे गावंडे यांनी सांगितले. गुलाबराव गावंडे यांच्या रूपाने पितृतुल्य आधार मिळाल्याची भावना ठोसरे कुटुंबियांनी व्यक्त केली. उघड्यावर आलेला संसार आणि मुलीच्या शिक्षणाला लोकमतमुळे आधार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमतच आमचे माय-बाप
ना शासनाच्या योजनेची माहिती, ना आम्हाला कोणी ओळखणारे, त्यामुळे आमचा आधार पूर्णत: तुटला होता. घरचा कर्ता माणूस गेल्याने आता संसाराचा गाडा ओढावा तरी कसा, हा प्रश्न पडला होता. मुला-बाळांसह आपणही आयुष्याचे बरे-वाईट करावे, असे विचार मनात घर करत असताना अचानक ह्यलोकमतह्ण माय-बाप म्हणून समोर आल्याच्या भावना लक्ष्मी व उज्ज्वलाच्या आईने व्यक्त केल्या.

Web Title: Life of Lakshmi found support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.