कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या १२ गुरांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:27+5:302021-06-28T04:14:27+5:30
नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत अकोला : परतवाडा येथून रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमिनपुरा येथे कत्तलीसाठी गुरांना एका वाहनात कोंबून ...
नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अकोला : परतवाडा येथून रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमिनपुरा येथे कत्तलीसाठी गुरांना एका वाहनात कोंबून निर्दयतेने आणण्यात येत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पाळत ठेवून १२ गुरांना रविवारी पहाटे जीवनदान दिले. यावेळी सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
खंगरपुरा येथील रहिवासी रिजवान उर रहमान मोबिन उर रहमान हा एम एच ३० बीडी २८६४ क्रमांकाच्या वाहनामध्ये १२ गुरांची परतवाडा येथून ताजनापेठ परिसरात कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पाळत ठेवून वाहन येताच ताब्यात घेतले. घटनास्थळावरून वाहनातील क्लीनर फरार झाला, तर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या बारा गुरांना जीवनदान देण्यात आले आहे. या गुरांची किंमत सुमारे दोन लाख ५० हजार रुपये व एक वाहन असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.