कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या २७ गुरांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:53 PM2020-07-05T12:53:57+5:302020-07-05T12:54:07+5:30
त्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या २७ गुरांना बार्शिटाकळी पोलिसांनी छापा टाकून जीवनदान दिले.
अकोला : बार्शिटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसाईपूरा येथे कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या २७ गुरांना बार्शिटाकळी पोलिसांनी छापा टाकून जीवनदान दिले. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली असून या अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या कत्तलखाण्यातून चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच ६०० कीलो मासही पोलिसांनी या ठिकाणावरुन जप्त केले.
बार्शिटाकळी शहरातील कसाईपुरा येथे गुरांची मोठया प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्याची माहिती बार्शिटाकळी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पडताळणी करून छापा टाकला असता कत्तलीसाठी बांधलेल्या २७ गुरांना जिवनदान दिले. सदर २७ गुरांची कींमत सुमारे चार लाख रुपयांची असून या ठिकाणावरुन ट्रक आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. यासोबतच एक लाख २१ हजार रुपये कींमतीचे ६०० कीलो मासही जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणच्या आरोपींविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम 1995, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा प्रतिबंधक कायदा 1960 तसेच भारतीय दंड विधान कलम 429 प्रमाणे पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे एकून पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या कत्तलखाण्याचा पुढील तपास बार्शिटाकळी पोलीस करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार साहायक पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, एएसआय सुरेंद्र जोशी, अरुण गावंडे, एनपीसी प्रताप सिंग राठोड, अनिल गाढवे, किशोर पवार, नागसेन वानखडे, पंकज पवार, ज्ञानेश्वर गीते, सूर्यकांत डोईफोडे , सुलोचना राऊत यांनी केली.
जिल्हयात कत्तलखाने जोरात
जिल्हयात गुरांची अवैध तसेच निर्दयतेने वाहतुक आणि त्यांची कत्तल करणाऱ्यांचे कारखाने जोरात सुरु असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. बाळापूर, पातूर, जुने शहरातील डाबकी रोड तसेच आकोट या परिसरात गुरांची मोठया प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून पाहीजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात येत नसल्याचेही वास्तव आहे.