वाडेगाव येथील विद्यार्थ्यांचा डोंग्यातून जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:06 PM2019-11-29T12:06:52+5:302019-11-29T12:07:05+5:30
शेकडो मुले-मुली शिक्षणाकरिता इंदिरा नगर (झोपडपट्टी) येथून निर्गुणा नदीच्या वाहत्या पात्रातून जीव धोक्यात टाकून ये-जा करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : येथील निर्गुणा नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात न आल्याने दररोज २०० ते २५० विद्यार्थी डोंग्यातून प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. डोंग्यातून जाताना मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पूल बांधण्याची मागणी होत आहे.
गावातील सोफी चौकमध्ये असलेल्या उर्दू जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेत दररोज शेकडो मुले-मुली शिक्षणाकरिता इंदिरा नगर (झोपडपट्टी) येथून निर्गुणा नदीच्या वाहत्या पात्रातून जीव धोक्यात टाकून ये-जा करीत आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्रात कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या पाण्यातून पायी जाणे कठीण झाले आहे. या पाण्यातून जाण्यासाठी डोंगा तयार करण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही काठांवर दोरी बांधण्यात आली असून, त्याच्या आधारे डोंग्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे पालक आपल्या पाल्यांना नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचवून देत असल्याचे चित्र आहे. या नदीपात्रातून प्रवास टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना चार किलोमीटर फेºयाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे खर्च परवडणारा नाही. नदीमधून प्रवास हा पाऊण ते एक किलोमीटर एवढा येत असल्यामुळे या पाण्यातून विद्यार्थी मार्ग काढत आहेत. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य अय्याज साहिल यांनी पूल बांधण्याकरिता वेळोवेळी निवेदन दिले आहे; मात्र प्रशासनाकडे हे निवेदन धूळ खात असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने पूल बांधण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)