वादळी पावसाने विद्युत खांब कोसळले!
By admin | Published: June 11, 2017 02:35 AM2017-06-11T02:35:49+5:302017-06-11T02:35:49+5:30
अकोट तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मान्सूनपूर्व वादळी पावसाने महावितरणला चांगलाच शॉक दिला असून, शुक्रवारी वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे अकोट तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले व वीज वाहिन्या तुटल्या, तर पातूर तालुक्यात विद्युत खांबांवरील इन्सूलेटर निकामी झाल्याने विद्युत पुरवठा खंडित राहिला. दरम्यान, महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शनिवारी दिवसभर कसरत करून कोसळलेले खांब उभे करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले.
शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वार्यासह बरसलेल्या पावसामुळे अकोट ते चोहोट्टा मार्गावरील ३३ के.व्ही.चे सात खांब उन्मळून पडले, तर ११ के. व्ही.चे १५ खांब कोसळले. यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या. परिणामी, चोहोट्टा व कुटासा उपकेंद्राचा विद्युत पुरवठा बंद होऊन दोन्ही उपकेंद्र ठप्प पडली. याशिवाय, चोहोट्टा परिसरात विद्युत रोहित्र असलेले खांब कोसळल्यामुळे रोहित्राचे मोठे नुकसान झाले. मान्सूनपूर्व पावसाने पातूर तालुक्यातही कहर केल्याने महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान झाले. विद्युत खांबांवरील इन्सूलेटर निकामी झाल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद होता. काही ठिकाणी रात्रभर विद्युत पुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
अधिकार्यांनी केली पाहणी
अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, अकोटचे कार्यकारी अभियंता काकडे यांनी शनिवारी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक अभियंते, अधिकारी व कर्मचार्यांना त्यांनी सूचनाही दिल्या.