इच्छुकांच्या गर्दीत ‘क्षमते’ला पसंती !
By admin | Published: January 26, 2017 10:11 AM2017-01-26T10:11:24+5:302017-01-26T10:11:24+5:30
उमेदवार निश्चितीसाठी राजकीय पक्षांची लगबग
अकोला : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार निश्चित करण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यामध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी असली, तरी उमेदवार निश्चित करताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत राजकीय पक्षांकडून पसंती देण्यात येत आहे.
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, उमेदवार निश्चित करण्याची लगबग सुरू करण्यात आली आहे. तर प्रभागनिहाय पक्षाच्या कार्यकर्त्यांंकडून प्राप्त झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या नावांमधून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून सुरू आहे. मनपा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रभागातील एका जागेकरिता सात-आठ उमेदवार इच्छुक आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित राजकीय पक्षाकडे अर्जही केले आहेत. मनपा निवडणुकीसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी असली, तरी प्रभागनिहाय उमेदवार निश्चित करताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये प्रभागातील राजकीय आणि जातीय समीकरण विचारात घेऊन, इच्छुक उमेदवारांपैकी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांकडून पसंती दिली जात आहे.