दुकाने स्थानांतरणासाठी लिकर लॉबीची धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 02:04 AM2017-04-12T02:04:26+5:302017-04-12T02:04:26+5:30

अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन शॉप, बार, बीअर शॉपी बंद केल्यामुळे लिकर लॉबीसमोर संकट निर्माण झाले आहे.

Likir lobby runs for shipment of shops! | दुकाने स्थानांतरणासाठी लिकर लॉबीची धाव!

दुकाने स्थानांतरणासाठी लिकर लॉबीची धाव!

Next

अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन शॉप, बार, बीअर शॉपी बंद केल्यामुळे लिकर लॉबीसमोर संकट निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्याचे लिकर लॉबीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जुन्या परवान्यावरच शहरातील वाइन शॉप, बार, राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर स्थानांतरित करण्यासाठी लिकर लॉबीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे धाव घेतली असून, दररोज स्थानांतरणाचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दाखल होत आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
जिल्ह्यातील २५० पैकी २२१ देशी, विदेशी दारूची दुकाने, बार, बीअर शॉपी बंद करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानांना भेटी देऊन त्यांच्याकडील स्टॉकरूमला टाळे लावल्यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व दारू विक्री दुकानांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फटका बसला. वर्षभराच्या आत काही हालचाली केल्या नाहीतर तर वाइन बार, शॉपचा परवाना रद्द होईल. या भीतीने अनेकांनी वाइन बार, शॉप स्थानांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय व राज्य महामार्गांपासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर आणि २0 हजार लोकसंख्येच्या गावापासून २२0 मीटर अंतरावर वाइन शॉप, बार, दुकाने स्थानांतरित करण्यासाठी दररोज दारू विक्रेते राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रस्ताव घेऊन येत आहेत. या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, असे आदेशच शासनाने बजावले आहे. त्यामुळे शहरातील काही वाइन शॉप, बार मालक महामार्गांपासून ५00 मीटर क्षेत्राबाहेर जागा शोधत आहेत. काहींना जागा उपलब्ध होत त्यांचे तातडीने स्थानांतरण करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे स्थानांतरणाचे ३२ प्रस्ताव आले असून, दररोज त्यात वाढ होत आहे.

स्थानांतरण निकषांचे पालन व्हावे
शहर व जिल्ह्यातील वाइन बार, शॉप स्थानांतरित करण्याचे लिकर लॉबीकडून प्रयत्न होत आहेत. जागा खरेदी करून किंवा भाड्याने घेऊन दुकाने स्थानांतरित करण्यात येत आहेत; परंतु दारूची दुकाने स्थानांतरित करताना शासनाने काही निकष घालून दिले आहेत.
दारूच्या दुकानांपासून धार्मिक स्थळ, शाळा, महाविद्यालय ५0 मीटर(शहरी भाग) आणि १00 मीटर (ग्रामीण भाग) एवढे अंतर असायला हवे; परंतु हा निकष लिकर लॉबी पाळते का, राज्य उत्पादन शुल्क विभाग हे अंतर मोजून त्यांना स्थानांतरणास परवानगी देते का, या प्रश्नांचीसुद्धा तपासणी व्हायला हवी.

शहर व जिल्ह्यातून अनेक दारू विक्रेत्यांकडून वाइन बार, शॉप स्थानांतरित करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे, असे शासनाचे निर्देश आहे. त्यामुळे शहरातील काही बार, शॉप स्थानांतरित करण्यात आले आहेत. निकषांची पूर्तता केल्यानंतर स्थानांतरणास परवानगी देण्यात येत आहे.
- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Web Title: Likir lobby runs for shipment of shops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.