अकोल्यातून वर्धा येथे नेण्यात येत असलेला दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 02:46 PM2019-10-15T14:46:29+5:302019-10-15T14:46:39+5:30
पोलिसांना पाहून दारूचे पोते फेकून दोन महिला फरार झाल्या, तर एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला: दारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात अकोल्यातून देशी दारूची रेल्वेने वर्धा येथे वाहतूक केल्या जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा सापळा रचून एकाला ताब्यात घेतल्यानंतर दोन महिलांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना पाहून दारूचे पोते फेकून दोन महिला फरार झाल्या, तर एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांचे पथक रामदासपेठ परिसरात गस्तीवर असताना सरकारी बगिचा येथे सायंकाळी ४ वाजता भांबुुरकर यांच्या हॉस्पिटलसमोर असलेल्या सरकारी देशी दारूच्या दुकानातून काही इसम हे दारूबंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर या ठिकाणी रेल्वेने दारू घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने भारत विद्यालय ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर नाकाबंदी केली असता एक दुचाकीस्वार येताना दिसून आला. त्याची दुचाकी थांबवून त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद वसीम शब्बीर पटेल (वय २६ वर्ष) रा. ग्राम अन्वी, ता.जि. अकोला असे सांगितले. त्याच्या जवळ असलेल्या तीन प्लास्टिक पोतड्या उघडून बघितल्या असता त्यात दारूचे ३०० क्वॉटर दिसून आले. पोलिसांनी दारू व दुचाकी असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सुरू असताना डोक्यावर तीन प्लास्टिकच्या पोतड्या घेऊन येताना तीन महिल्या दिसल्या. त्यांना पोलिसांची चाहुल लागताच त्या पळून गेल्या. त्यांच्या पोतड्यामधून देशी दारूचे २९६ क्वॉटर किंमत ७ हजार ६९६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून रामदासपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.