द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते ठरणार पिकांसाठी प्रभावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:21 AM2021-09-22T04:21:53+5:302021-09-22T04:21:53+5:30
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक ...
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते, तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराबाबत घेतली जात नाही. मात्र, मागील काही काळात या अन्नद्रव्यांचा वापर वाढला आहे. यामध्ये खासगी कंपन्यांची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, ती महागडी असल्याने शेतकऱ्यांना परवडणारी नाहीत. हा विषय हेरून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद, विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने या सूक्ष्म अन्नद्रव्याची निर्मिती सुरू केली. १५ ऑगस्ट रोजी या केंद्राचे उद्घाटन पार पडले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळण्यास मदत होणार होत आहे. ही खते विदर्भातील ८ केव्हीकेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
मुख्य अन्नद्रव्याची मुबलकता वाढविण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीचे पृथक्करण करण्यात येत आहे. विद्यापीठाद्वारे हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पांना शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. संजय भोयर, विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, डॉ.पंदेकृवि
सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढत असलेली कमतरता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी जमिनीतून व फवाऱ्याच्या माध्यमातून सूक्ष्म अन्न द्रव्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांना विद्यापीठाचा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.
- डॉ. संदीप हाडोळे, प्रभारी अधिकारी, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प
पिकांचे तीन ग्रेड तयार
या केंद्रातून निर्माण होणाऱ्या निविष्ठांमध्ये पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड २ फळबाग व भाजीपाला पिकांकरिता, पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड १० कडधान्य पिकांकरिता, पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड ११ कपाशी पिकाकरिता तयार करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ना नफा, ना तोटा तत्त्वावर ही खते विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत.
राज्यातील एकमेव सेंटर
या प्रकल्पाकरिता भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ यांच्याकडून ७५ टक्के, तर राज्य सरकारकडून २५ टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. तीन प्रकारच्या ग्रेडमध्ये द्रवरूप अन्नद्रव्य खते तयार करणारे हे राज्यातील एकमेव सेंटर असल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.