‘वंचित’च्या १३ उमेदवारांची यादी जाहीर; पाच माजी सदस्यांना पुन्हा संधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:28+5:302021-07-04T04:14:28+5:30
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी दुपारी ...
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी निश्चित करण्याच्या राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असतानाच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या १४ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी १३ उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांना पुन्हा संधी देण्यात आली असून, दोन जागांवर फेरबदल करण्यात आला, तर एका जागेसाठी उमेदवाराचा निर्णय आज, रविवारी पक्षाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या, सोमवारी (दि. ५ जुलै) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट व दिनकर खंडारे यांनी शनिवारी, ३ जुलै रोजी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या १३ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये चार महिन्यांपूर्वी सदस्यत्व रद्द झालेल्या पक्षाच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, तेल्हारा तालुुक्यातील अडगाव बु. या जागेसाठी माजी सदस्य प्रमोदिनी गोपाल कोल्हे यांच्याऐवजी सुनंदा काशीराम साबळे यांना, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या कानशिवणी जिल्हा परिषद गटातून माजी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याऐवजी प्रतिभा अवचार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सहा जागांसाठी पक्षाकडून नवीन उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, कुरणखेड या एका जागेसाठी उमेदवाराचा निर्णय रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
जि. प. गटनिहाय ‘वंचित’च्या उमेदवारांची अशी आहे यादी !
तालुका जि. प. गट उमेदवार
तेल्हारा दानापूर दीपमाला दामधर
तेल्हारा अडगाव बु. सुनंदा साबळे
तेल्हारा तळेगाव बु. संगीता अढाऊ
अकोट अकोलखेड रामभाऊ भाष्कर
अकोट कुटासा सुलता बुटे
मूर्तिजापूर लाखपुरी वंदना मेसरे
मूर्तिजापूर बपोरी राजकन्या खंडारे
अकोला घुसर शंकर इंगळे
अकोला कानशिवणी प्रतिभा अवचार
बाळापूर अंदुरा मीना बावणे
बाळापूर देगाव राम गव्हाणकर
बार्शिटाकळी दगडपारवा उज्ज्वला जाधव
पातूर शिर्ला सुनील फाटकर
कुरणखेड जि. प. गटाच्या
उमेदवारीकडे लागले लक्ष!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या १४ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी १३ जागांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, कुरणखेड जिल्हा परिषद गट या एका जागेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा पक्षाकडून आज, रविवारी होण्याची शक्यता आहे. या जिल्हा परिषद गटातून यापूर्वी पक्षाच्या मनीषा बोर्डे निवडून आल्या होत्या. आता हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याच्या पार्श्वभूमीवर या गटातून सुशांत बोर्डे आणि माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी या गटातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी कोणाला जाहीर होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
काॅंग्रेस उमेदवारांची यादी
उद्या होणार जाहीर!
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी काॅंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी सोमवार, ५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी शनिवारी सांगितले.