अर्ज वैध ठरलेल्या २५६ उमेदवारांची यादी जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:23 AM2021-09-22T04:23:01+5:302021-09-22T04:23:01+5:30
अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्हयातील पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज ...
अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्हयातील पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या जिल्हयातील २५६ उमेदवारांची यादी मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे १४ गट आणि जिल्हयातील ७ पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणुकांसाठी जिल्हयात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गत ९ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगामार्फत १३ सप्टेंबर रोजी पुनश्च पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या १४ गटांत आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांमध्ये उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या २५६ उमेदवारांची यादी जिल्हयातील सातही तालुक्यांत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ९५ आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी १६१ उमेदवारांचा समावेश आहे.