कृषी योजनांच्या लाभार्थी यादीत घोळ
By admin | Published: August 9, 2016 02:32 AM2016-08-09T02:32:06+5:302016-08-09T02:32:06+5:30
अकोला जिल्हा परिषद सदस्याचा कृषी योजनांमध्ये घोळ झाल्याचस आरोप; ‘एडीओं’ ना माहिती मागितली.
अकोला: सेस फंडातून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या लाभार्थी यादीत घोळ झाल्याचा आरोप करीत, यासंदर्भात सर्व माहिती देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी सोमवारी कृषी विकास अधिकार्यांकडे (एडीओ) केली.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन २0१५-१६ या वर्षातील एचडीपीई पाइप, इलेक्ट्रिक मोटरपंप, सबर्मसिबल पंप, डिझेल पंप, चापकटर व मनुष्यचलित पेरणीयंत्र इत्यादी साहित्य वाटपाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हय़ातील लाभार्थी शेतकर्यांना कृषी विभागामार्फत गत महिन्यापासून साहित्य वाटप सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांची भेट घेऊन कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांच्या लाभार्थी यादीवर आक्षेप घेतला. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले नाही, तसेच लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केली नाही, अशा लाभार्थ्यांची नावे लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याने लाभार्थ्यांच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानुषंगाने योजनानिहाय लाभार्थ्यांचे प्राप्त अर्ज, निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी, लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केलेले लाभार्थी यासंबंधी माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही सदस्य देशमुख यांनी कृषी विकास अधिकार्यांकडे केली.