चिमुकलीचा विनयभंग, आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 10:46 AM2022-06-05T10:46:17+5:302022-06-05T10:46:23+5:30
Crime News : विजय ऊर्फ फक्कर पुंजाजी खोबरे (५३) याने तिच्या चार वर्षीय मुलीला बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले.
अकोला : शहरातील एका ४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्या ५४ वर्षीय आरोपीला अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शनिवारी शिक्षा ठोठावली.
मुलीच्या आईने १२ डिसेंबर २०२० रोजी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास टेकडी भागातील आरोपी विजय ऊर्फ फक्कर पुंजाजी खोबरे (५३) याने तिच्या चार वर्षीय मुलीला बाजूला नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याची माहिती मुलीच्या आईला कळताच, तिने मुलीची सुटका करीत खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दाखल केली. याप्रकरणात खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४(अ), पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने ४ साक्षीदार तपासले. आरोपीविरुद्ध साक्ष व पुरावे ग्राह्य माणून न्यायालयाने आरोपी विजय ऊर्फ फक्कर पुंजाजी खोबरे याला दोषी ठरवून ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तीन हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी विधिज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय कान्हेरकर, महिला पोलीस कर्मचारी सोनू आडे यांनी काम पाहिले.