मृत व्यक्तीला दाखविले जिवंत
By admin | Published: September 26, 2014 01:49 AM2014-09-26T01:49:19+5:302014-09-26T01:49:19+5:30
आरोग्य सुविधेच्या लाभासाठी नाव बदलले.
अकोला : अनेकजण बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याच्या घटना बर्याचदा घडतात. असाच एक प्रकार सर्वोपचार रुग्णालयात उघडकीस आला. सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केलेल्या व्यक्तीला मोफत उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी चक्क दुसर्याच्या नावावर भरती केले.
मंगरूळपीर तालुक्यातील जामदरा घोटी येथील ४५ वर्षीय व्यक्ती १९ सप्टेंबर रोजी शेतात कीटकनाशक औषध फवारणीसाठी गेला होता; परंतु रात्री त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला कारंजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीला २0 स प्टेंबरला सर्वोपचार रुग्णालयात आणले; परंतु रुग्णालयातील खर्चापासून वाचण्यासाठी रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांनी नवीन शक्कल लढविली आणि पिवळे रेशनकार्ड असेल तर मोफत उपचार होऊ शकतो, असे सांगितले आणि एका नातेवाईकाच्या नावाचे पिवळे रेशनकार्ड आणून त्याच्या नावावर त्या रुग्णास भरती केले. चार दिवस उपचार केल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने, त्याच्या नावाची नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मृतकाचे कुटुंबीय, नातेवाईक घाबरून गेले. आता काय करावे. मृतकाला तर आपण जवळच्या एका नातेवाईकाच्या नावावर भरती केले. त्याने सर्वच जण मृतकाच्या नावाची नोंद करण्यास टाळाटाळ करू लागले. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने, पोलिसांनी मृतकाचे कुटुंबीय व नातेवाईकांना फटकारत, गावातील सरपंच व पोलिस पाटील यांना सर्वोपचार रुग्णालयात बोलाविण्यास सांगितले.
मृतकाच्या मुलाने पोलिसांच्या समक्ष चुकीची कबुली देत, मृतकाचे खरे नाव सांगितले आणि जबाब नोंदविला. गावातील उपसरपंच व पोलिस पाटील यांनी जबाबावर स्वाक्षरी केल्याने प्रकरण मिटले.