जिवंत अर्भक आढळले!
By admin | Published: July 7, 2016 02:08 AM2016-07-07T02:08:52+5:302016-07-07T02:08:52+5:30
मालेगाव तालुक्यातील शेतात स्त्री अर्भक आढळले; अज्ञात मातेविरूद्ध गुन्हा दाखल.
जऊळका रेल्वे (जि. वाशिम) : मालेगाव तालुक्यातील जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या एका शेतात बुधवारी दुपारच्या सुमारास जिवंत स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे. या अर्भकाला वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. जामखेड ते हनवतखेडा या मार्गालगतच्या आत्माराम पोफळे यांच्या शेताच्या धुर्यावर लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने शेतातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्त्री जातीचे अर्भक असल्याचे दिसून आले. जामखेडचे सरपंच मनासाराम भोंडणे यांनी याप्रकरणी जऊळका पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक आरसेवार, ठोके व त्यांचे सहकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे हे घटनास्थळी पोहोचले. त्या अर्भकावर जऊळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारार्थ सदर अर्भक वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुपूर्द करण्यात आले. पोटच्या गोळ्याला बेवारस स्थितीत फेकून पोबारा करणार्या अज्ञात निर्दयी मातेविरुद्ध जऊळका पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.